ध्वजारोहण विशेष पुरवणी
.............
नाशिकच्या सुरक्षेला दीर्घकालीन बळकटी देणारी पर्वणी
लीड
सिंहस्थ कुंभमेळा साजरा होईल, भाविक आपापल्या घरी परततील आणि कुंभमेळ्याची गडबड शांत होईल; परंतु या सोहळ्यानिमित्त उभारलेल्या सुविधा, आधुनिक उपकरणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ नाशिकमध्येच राहणार आहे. सीसीटीव्ही शहरावर अखंड नजर ठेवतील आणि नवीन वाहने कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीला धावून येतील. थोडक्यात सांगायचे तर, कुंभमेळ्याच्या निमित्ताने मिळालेले प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा भविष्यात नाशिक शहराच्या सुरक्षेची मजबूत आणि कायमस्वरूपी ताकद बनतील.
-संदीप कर्णिक,
पोलिस आयुक्त, नाशिक शहर
....
सिंहस्थ कुंभमेळा हे केवळ एका मोठ्या धार्मिक सोहळ्याच्या सुरक्षेचे नियोजन करण्याचे आव्हान नसून, आगामी काळात शहराच्या संपूर्ण सुरक्षाव्यवस्थेला अधिक सक्षम, आधुनिक आणि बळकट करण्याची एक मोठी संधी आहे. कुंभमेळ्यानिमित्त ज्या विविध साधनसामग्री, पायाभूत सुविधा आणि अद्ययावत यंत्रणा तयार केल्या जात आहेत, त्या सोहळा संपल्यानंतरही पोलिसांच्या दैनंदिन सेवेमध्ये कायमस्वरूपी उपयुक्त ठरणार आहेत. कोणतीही अप्रिय घटना न घडता सिंहस्थ पार पडावा यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आधुनिक एआय बेस तंत्रज्ञानाच्या आधारे बंदोबस्ताचे सूक्ष्म नियोजन केले आहे. शहरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद एआय बेस सीसीटीव्हीच्या माध्यमातून होणार आहे. नाशिक शहराच्या सुरक्षेला यामुळे दीर्घकालीन बळकटीची पर्वणीच यानिमित्ताने मिळणार आहे. सिंहस्थाच्या सुरक्षेसाठी येणाऱ्या सुमारे ३५ ते ४० हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासाची भक्कम व्यवस्था केली जात आहे. विद्यमान बॅरेक्सच्या दुरुस्तीसोबतच विविध पोलिस ठाण्यांच्या आवारात नवीन शेड्स उभारून निवासाची सोय केली जात आहे. ही सुविधा केवळ कुंभमेळ्यापुरती मर्यादित न राहता, भविष्यात होणारी नवीन पोलिस भरती, बाहेरून येणारे अतिरिक्त पोलिस बल आणि विशेष बंदोबस्तासाठी तैनात होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दीर्घकाळ उपयोगी पडणार आहे.
---
शहरभर सीसीटीव्हीचे जाळे
शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने तीन हजार सीसीटीव्ही बसवले जात आहेत. कुंभमेळ्यानंतरही हे सीसीटीव्ही शहरात कायमस्वरूपी कार्यरत राहतील. गुन्हेगारीला आळा घालणे, गुन्ह्यांचा तपास, संशयित हालचालींवर लक्ष ठेवणे, वाहतूक नियंत्रण, गर्दीचे व्यवस्थापन आणि संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा यासाठी या प्रणालीचा नियमित वापर केला जाईल. आज जे सीसीटीव्ही कुंभमेळ्याच्या अथांग गर्दीवर लक्ष ठेवतील, उद्या तेच नाशिककरांच्या रोजच्या सुरक्षेची ढाल बनतील.
--
विशेष वाहनांची ताफ्यात भर
सिंहस्थासाठी नवीन पोलिस वाहनांसोबतच विशेष प्रयोजनासाठी लागणारी वाहने उपलब्ध केली जात आहेत. यात बॉम्बशोधक व नाशक पथकाची (बीडीडीएस) वाहने, श्वानपथकाची वाहने, बुलेटप्रूफ वाहने, क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) वाहने, वॉटर कॅनन अर्थात पाण्याचा फवारा मारणारी वाहने, या वाहनांचा उपयोग केवळ कुंभमेळ्यापुरता मर्यादित नसून भविष्यातील नियमित गस्त, बीट मार्शलिंग, आपत्कालीन प्रतिसाद, गुन्हे तपास, वाहतूक नियंत्रण आणि धार्मिक सोहळे किंवा मिरवणुकांच्या बंदोबस्तात केला जाईल.
--
भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज
सिंहस्थानिमित्त पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्डसना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. गर्दी आणि वाहतूक व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन व नदीपात्रातील बचावकार्य, सायबर गुन्हे आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर, सीसीटीव्ही व आधुनिक उपकरणांचा वापर, क्यूआरटीची कार्यप्रणाली व आपत्कालीन प्रतिसाद, हे प्रशिक्षण सोहळ्यानंतरही पोलिस दलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अत्यंत मोलाचे ठरणार आहे. कुंभमेळ्यासाठी उपलब्ध करून दिलेले बॅरिकेड्स, वायरलेस व संवादाची साधने, बीडीडीएस उपकरणे, आपत्ती व्यवस्थापन साहित्य आणि गर्दी नियंत्रणाची साधने नाशिक पोलिसांच्या ताफ्यात कायम राहतील आणि गरजेनुसार त्यांचा वापर सुरूच राहील.
--
वाहतुकीचे काटेकोर नियोजन
सिंहस्थाच्या अनुषंगाने रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. येत्या मार्चपर्यंत ९० टक्के कामे पूर्ण होतील. जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत द्वारका सर्कल येथील काम पूर्णत्वास जाईल. यामुळे येथील वाहतूक कोंडीची समस्या कायमची सुटण्यास मदत होणार आहे. बाह्य रिंग रोडमुळे शहरांतर्गत वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. बाह्य वाहनतळावरून घाटानजीकच्या वाहनतळापर्यंत येण्यास भाविकांना मोफत शटल बससेवा उपलब्ध असणार आहे. प्रत्येक चौकात भाविकांना मार्ग दाखविण्यासाठी वाहतूक पोलिस असणार आहे. बॅरिकेडिंग टप्प्याटप्प्याने केले जाईल. शाही पर्वणीकाळात शहरातील प्रमुख रस्ते बंद असतील. परंतु त्याच वेळी रुग्णवाहिका, महत्त्वाच्या खरेदीसाठीचे मार्ग खुले असतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.