फोटो : H31329
---
साहित्य संस्थामध्ये समन्वय गरजेचा
सहविचार सभेतील सूर; विविध ठरावांना मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ : शहराला साहित्य, संस्कृती, ग्रंथालये आणि साहित्यिक चळवळींचा समृद्ध वारसा लाभला आहे. त्यामुळे शहरातील अनेक साहित्यिक संस्था मराठी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनासाठी कार्य करीत असतात परंतू, सर्व संस्था एकत्रित आल्यानंतर कार्यांचा समन्वय साधून मोठे उद्दिष्ट साध्य करता येईल असा सूर साहित्य पदाधिकाऱ्यांच्या सहविचार सभेत उमटला.
मराठी अभिजात भाषा गौरव दिनानिमित्त नाशिक कवीचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष सबनीस यांनी सहविचार सभा आयोजित केली होती. अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्थेत सभा झाली. या सभेत शहरातील सर्व साहित्य संस्थांचे पदाधिकारी नरेश महाजन, विवेक उगलमुगले, सतीश बोरा, देवदत्त जोशी, संजय गोरडे, बाळासाहेब गिरी, नरेंद्र पाटील, यशवंत पाटील, नंदकिशोर ठोंबरे, प्रभाकर कुलकर्णी, विश्वास देवकर, किरण सोनार उपस्थित होते. सभेच्या उद्दिष्टांमध्ये सर्व साहित्यिक संस्थांच्या कार्यात समन्वय निर्माण करणे. मराठी भाषा, साहित्य, वाचनसंस्कृती आणि नव्या पिढीतील मराठी प्रेम वाढविण्यासाठी वर्षभराचे नियोजन करणे. प्रत्येक संस्थेला सहभागी करून घेणारी, मोजता येतील अशी उद्दिष्टे असलेली कृती योजना तयार करणे असे उद्दिष्टे ठरविण्यात आले. सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी यासाठी योगदान देण्याचे मान्य केले.
---चौकट
मंजूर झालेले ठराव
इच्छुक साहित्यिक संस्थांची समन्वय समिती स्थापन करणे. २०२६-२७ कालावधीसाठी सर्व संस्थांचे कार्यक्रम एकत्रित करून वार्षिक कार्यक्रम पत्रिका तयार करणे. शाळा, महाविद्यालये आणि ग्रंथालयांच्या सहकार्याने मराठी वाचन व लेखन अभियान सुरू करणे. साहित्यिक, पुस्तक, साहित्य संस्था आणि उपक्रम यांची अद्ययावत डिजिटल निर्देशिका तयार करणे. दर तीन महिन्यांनी होणाऱ्या बैठकीत पुढील कार्यशैली ठरविणे.
----------