फोटो ; A15078
नाशिक : कानडे मारुती मंदिरासमोर पाण्याची पाइपलाइन फुटून वाया जाणारे पाणी
--
केबलच्या खोदकामादरम्यान पाइपलाइन फुटली
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. २४ : शहरात शनिवारी (ता. २४) पाणीपुरवठा बंद ठेवल्याने नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागला. हंडाभर पाण्यासाठी काही भागातील नागरिकांना दिवसभर वणवण करावी लागली. एकीकडे नागरिक पाण्यासाठी त्रस्त असताना, दुसरीकडे दहिपूल परिसरातील कानडे मारुती मंदिरासमोर भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू असताना पाइपलाइन फुटली. यामुळे वाहणाऱ्या पाण्यामुळे संपूर्ण रस्त्याला नदीचे स्वरूप आल्याचे दिसून आले.
देखभाल- दुरुस्तीसाठी शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. यामुळे बहुतांश भागात सकाळचा पुरवठा होऊ शकला नाही. अनेकांना आगाऊ पाणी साठवणूक करणे शक्य न झाल्याने हंडाभर पाण्यासाठी त्यांची भटकंती झाली. काही सोसायट्यांनी टँकर मागवले, तर काही भागात नगरसेवकांच्या माध्यमातून टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र, तरीही अनेक नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागले. एकीकडे पाणीकपातीमुळे वणवण होत असताना, दहिपूल येथील कानडे मारुती मंदिरासमोर भूमिगत केबलच्या खोदकामादरम्यान ड्रिलिंगच्या धक्क्याने पाण्याची मुख्य पाइपलाइन फुटली. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. कानडे मारुती लेन कॉर्नर ते गाडगे महाराज पुलापर्यंत रस्त्यावरून पाणी वाहत थेट नदीपात्रात जाऊन मिसळले. परिणामी, परिसरातील रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप आले होते. पाण्याची टंचाई जाणवत असताना दुसरीकडे अशा प्रकारे लाखो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अनेक नागरिकांनी पाइपलाइन फुटल्याने वाया जाणारे पाणी आणि रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्याचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर प्रसारित केले. तसेच महापालिका आणि संबंधित विभागाच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त केला.