सदर : घटनाचक्र
लेखक : अभय सुपेकर
गरज स्वशासन, स्वयंशिस्तीची...
लीड...
गेल्या काही महिन्यांत नाशिकमध्ये हवा व पाण्याचे प्रदूषण वेगाने वाढत आहे. त्याला नियंत्रणात ठेवणे, ही केवळ सरकार किंवा प्रशासनाची जबाबदारी नाही; तर ती शहरवासीय म्हणून आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाने काही बाबतीत स्वयंशिस्तीचे पालन करणे आणि अंगी स्वशासनाची वृत्ती दृढमूल करण्याची गरज आहे.
- अभय सुपेकर
-------------
दी पोत्सवाच्या पर्वाने संपूर्ण नाशिकसह अनेक शहरे, गावे उजळून निघाली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीची रात्र तर फटाक्यांच्या आतषबाजीने दणाणून सोडली गेली. काही तास कानाचे धडे बसत होते, धडाडधुम्म अशा आवाजाने कानठळ्या बसत होत्या. अनेकांच्या घरात आणि परिसरात एकमेकांशी मोठ्यांदा किंवा ओरडून बोलल्याशिवाय ऐकूच येत नव्हते. आसमंत... त्याबाबत तर काय बोलावे! तो तर फटाक्यांच्या रंगीबेरंगी नक्षीने उजळून निघत होता. क्षणाक्षणाला त्याच्या पार्श्वभूमीवर नवनवी नक्षी मोहक आकार घेत मनाला लुभवत होती. या दीपोत्सवात कुठेही दुष्काळी स्थितीचा मागमूस दिसत नव्हता. शहरी भागातील हे चित्र एका बाजूला, त्याचवेळी खेड्या-पाड्यात, अगदी नाशिकच्या वेशीवरील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यांच्या आदिवासी पाड्यांवरील चित्र विपरीत होते. विरोधाभासाचे चित्र दिवसेंदिवस गहिरे होत आहे. श्रीमंत-गरीब नाही, तर शहरी-ग्रामीण यांच्या समाजजीवनातील रुंदावणाऱ्या दरीमुळे हे चिंतेचे ढग गडद होत आहेत, हे खेदजनक चित्र एका बाजूला. दुसरीकडे आपणच आपल्या हवेचे, पाण्याचे प्रदूषणही यानिमित्ताने करीत आहोत. आपलेच जगणे आपण अधिक यातनामय करीत आहोत. दीपावली किंवा कोणत्याही सण-उत्सवाला, त्यामागील भूमिकांना दोष न देता, त्याच्या मूळ उद्देशाचे पावित्र्य जपणे, हे महत्त्वाचे वाटते.
दीपोत्सवाच्या काळात नाशिकमधील हवेची गुणवत्ता २३४ पीएम एवढी होती, म्हणजेच या शहराची हवा खराब श्रेणीत पोहोचली होती. ता. ७ ते ९ नोव्हेंबरच्या कालावधीतील हे चित्र कमी-अधिक प्रमाणात असेच राहिले. विशेषतः नाशिकमधील पांडवनगरी, हिरावाडी, गंगापूर रस्ता, अंबड औद्योगिक वसाहत या भागातील हवेची गुणवत्ता ढासळलेली होती. त्याबाबत घराघरांतून तक्रारी झाल्या. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, बालके घरात असलेल्या मंडळींनी शहरातील वाढत्या प्रदूषणाबाबत आणि बिघडलेल्या हवेबाबत नाराजी व्यक्त केली. अर्थात, हे केवळ नाशिकमध्येच घडले, असे नाही तर नाशिकच्या वाटेवर जाऊ पाहणाऱ्या जळगाव शहरातील स्थितीही यापेक्षा फारशी वेगळी नव्हती. तेथेही हवेची गुणवत्ता खालावलेली, धोकादायक म्हणण्यापेक्षा त्रासदायक पातळीवर पोहोचल्याचे नोंदविले गेले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जळगावात हवेचा निर्देशांक २३० च्या पुढे पोहोचला होता. ही वाढ १८० पट एवढी प्रचंड होती. गारवा आणि स्थिर हवेमुळे प्रदूषित घटक वातावरणात साचल्याने हवेची गुणवत्ता खालावली. दरवर्षी सप्टेंबर ते जानेवारीदरम्यान जळगावच्या हवेची गुणवत्ता ढासळते, असे साधारण निरीक्षण आहे.
कोणताही सण, उत्सव हा साजराच करायचा असतो. त्याचा मनमुराद आस्वाद घ्यायचा असतो. नव्हे, त्यासाठीच तो असतो, हे खरे आहे. माणसाला तिमिरातून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणून दीपोत्सवाकडे पाहिले जाते. त्याचा उत्साहही अपूर्व असाच असतो. जीवनातील अंधःकार, मनातील मळभ दूर करून जगण्याला नवी उर्मी हा सण देत असतो. तथापि, गेल्या काही वर्षांत अशा स्वरूपाच्या उत्सवाला येणारे ‘सेलिब्रेशन’चे रूप वेगवेगळ्या आपत्तींना आमंत्रण देत आहे. आनंद साजरा करीत असतानाच त्यावर विरजण घालणारे प्रकार आपण टाळायला हवेत. विशेषतः शहरी भागात, मग नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार असो, नाही तर तालुकास्तरावरील गावे सगळीकडेच फटाक्यांची होणारी आतषबाजी आरोग्याला घातक ठरू लागली आहे. किती फटाके फोडावेत, किती खर्च करावा, हा ज्याच्या-त्याच्या मानसिकतेचा, इच्छेचा भाग आहे. त्याला कोणी दोषही देता कामा नये. तथापि, आपला आनंद साजरा करीत असताना इतरांच्या आरोग्यावर घातक परिणाम, त्यांना त्रासदायक होईल, असे वर्तनही टाळले पाहिजे.
अशीच काहीशी स्थिती गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने निघणाऱ्या मिरवणुकांवेळची. डीजे लावावा की नाही? पारंपरिक ढोल-ताशा वाजवावा की नाही? अशा मुद्यांवर खूप-खूप वेगवेगळी आणि टोकाची मते समाजात आहेत. त्याचे समर्थक आणि विरोधक दोघेही अहमहमिकेने आपापल्या बाजू पटवून देत असतात. तरीही मुद्दा किमान एवढा तरी उरतोच, की आवाजाची पातळी सुसह्य, कोणालाही त्रास, उपद्रवकारक ठरणार नाही, एवढी तरी राखावी! ही किमान अपेक्षा कोणीही टाळू शकणार नाही. त्याला विरोध करतील, असेही वाटत नाही. अर्थात, गणेशोत्सवात आपल्याकडे या मुद्यावर सांगोपांग चर्चा झाली, त्यामुळे कानठळ्या कमी बसल्या, हेही नसे थोडके!
जी बाब हवा आणि ध्वनीप्रदूषणाची, तिच स्थिती जलप्रदूषणाची. ध्वजारोहणाने ३१ ऑक्टोबरला सिंहस्थ कुंभमेळा सुरू झाला आहे. त्याच तोंडावर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीचा दाखला देत नाशिकच्या गोदामायच्या जलप्रदूषणाकडे लक्षवेध करणारी आकडेवारी समोर आली. काही भागातील पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण नगण्यच्या बरोबर नोंदविले गेले, असे निदर्शनाला आले. अर्थात, आपल्याकडील कोणत्याही नद्यांच्या पाण्याची तपासणी केली तरी त्यापेक्षा वेगळे चित्र अपवादानेच आढळेल. ‘स्वच्छ नदी, सुंदर नदी,’ ‘नदी ही माता...’ अशा घोषणाबाजीपलीकडे आपण काहीच करीत नाही. कृतिशून्य वृत्तीमुळे नद्यांचा श्वास गुदमरत आहे. अनेक ठिकाणच्या नद्यांच्या प्रदूषित पाण्याने माश्यांसह जलचरांचा बळी पडण्याच्या घटनाही नित्याच्या आहेत.
मुद्दा हा आहे, की ‘कळते; पण वळत नाही’ ही आपली मानसिकता. जे काही करायचे ते सरकारनेच करावे. प्रशासनानेच ठोस पावले उचलावीत. त्यांचे हात कोणी बांधलेत? ते काय झोपा काढतात काय? प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबीचे) अधिकारी करतात तरी काय? नदी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका काहीच करीत नाही, अशा शेलक्या विधानांनी आपण त्यांना दोष देत असतो. त्यांचा समाचार घेत असतो. तसेच, हवेची गुणवत्ता जपणे, ध्वनिप्रदूषणाला आळा घालणे, जलप्रदूषणाला टाळणे, ही जबाबदारीच व्यवस्थेची आणि इतरांची असे सांगत आपण सर्रासपणे बेताल कृती करतो. घालून दिलेले आदर्श नियम, कायदे पाळत नाही. ते धाब्यावर बसविण्यासाठीच आपण ‘सेलिब्रेशन’ करतो, या भावनेतून आपण ‘एन्जॉय’ करतो, हेच चुकीचे आहे. निर्माल्यकुंडात निर्माल्य टाकणे, कचरा फक्त घंटागाडीतच टाकणे, प्रदूषणकारी, घातक फटाके न फोडणे, त्यांचा अतिरेक करीत बेमुर्वतखोरपणा टाळणे, यातच शहाणपण आहे. यातच सामाजिक बांधिलकीचे भान आणि व्यापक समाजहिताचे सूत्र सामावलेले आहे. अशा मानसिकतेतील बदलाची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करायला हवी. स्वतःबरोबरच इतरांना सजग व सतर्क करणे, त्यांनाही आपल्याबरोबर नियम, अटींचे पालन करायला प्रवृत्त करणे, याची गरज आहे. तसे झाले तर सर्व प्रकारचे प्रदूषण टाळत, जबाबदारीचे भान जपत आपण प्रदूषणाच्या अंधःकाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे निश्चित वाटचाल करू शकू. चला, आपण सामाजिक जबाबदारी, संकेतांचे भान पाळूया!
.........................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.