ध्वजारोहण पुरवणी लेख
---
पुरोहित संघांनी जपला
धार्मिक- सांस्कृतिक वारसा
लीड
गोदावरी नदीच्या पवित्र तीरावर वसलेले नाशिक आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर ही महाराष्ट्रातील महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आहेत. रामतीर्थ, गोदाघाट आणि कुशावर्त तीर्थाशी जोडलेल्या धार्मिक परंपरांमध्ये तीर्थ पुरोहितांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. पिढ्यान्पिढ्या चालत आलेले पौरोहित्य, धार्मिक विधींचे ज्ञान आणि भाविकांच्या कौटुंबिक वंशावळींचे जतन या माध्यमातून पुरोहित संघांनी धार्मिक-सांस्कृतिक वारसा जपला आहे.
---
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा वारसा सुरक्षित ठेवतानाच भाविकांना अधिक सुलभ सेवा देणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि आखाडे, साधू- महंत व प्रशासनाशी समन्वय साधणे, ही दोन्ही ठिकाणच्या पुरोहित संघांसमोरील महत्त्वाची आव्हाने आहेत, त्याबाबत यथोचित कार्यवाही सुरू आहे. गंगा- गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या माध्यमातून गोदावरी तीरावरील धार्मिक परंपरा आणि तीर्थपुरोहितांचे संघटनात्मक कार्य पुढे नेले जात आहे. पुरोहित संघाच्या कुंभमेळा समितीचे अध्यक्ष सतीश शुक्ल आणि संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक कामकाजाला नवी दिशा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुमारे ३८ वर्षांनंतर नव्या सभासद नोंदणीला मान्यता देण्यात आली होती. नाशिकमध्ये वंशावळी जतन करणारी सुमारे ३५० तीर्थपुरोहित घराणी आहेत. नाशिकला देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या धार्मिक विधींमध्ये तीर्थपुरोहित महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक कुटुंबे पिढ्यान्पिढ्या आपल्या पारंपरिक पुरोहितांशी संपर्क ठेवतात. पुरोहितांकडील वंशावळींमध्ये पूर्वजांची नावे, कौटुंबिक संबंध आणि धार्मिक यात्रांच्या परंपरांशी संबंधित नोंदी जतन झालेल्या असतात. त्यामुळे या नोंदींना केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. या परंपरेचे जतन करण्यासाठी जुन्या नोंदींची सुरक्षित साठवण, त्यांचे वर्गीकरण आणि आवश्यकतेनुसार माहिती शोधण्याची व्यवस्था विकसित करण्याकडे कल आहे. पारंपरिक नोंदींचे डिजिटल माध्यमातून जतन केल्याने त्यांची सुरक्षितता वाढविण्याबरोबरच भाविकांना माहिती मिळविणेही सुलभ होऊ शकते, हे लक्षात आल्याने त्यानुसार कामकाज सुरू आहे.
--
भाविक सेवेचे मोठे आव्हान
सिंहस्थ कुंभमेळा काळात धार्मिक विधींसाठी पुरोहितांची उपलब्धता, भाविकांना मार्गदर्शन, गर्दीच्या काळातील समन्वय आणि धार्मिक स्थळांवरील शिस्त या बाबींना विशेष महत्त्व असेल. आखाडे, साधू- महंत, मंदिर व्यवस्था आणि कुंभमेळा प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याची गरजही वाढणार आहे. भाविकांना पुरोहितांशी संपर्क साधण्यासाठी सुलभ व्यवस्था, धार्मिक विधींची माहिती, ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन आणि गर्दीच्या काळात आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने नियोजन करण्याची गरज आहे. पुरोहित संघ उपलब्ध मनुष्यबळाचे नियोजन, संपर्ककेंद्रांची व्यवस्था आणि प्रशासनाशी समन्वय यावर लक्ष केंद्रित करीत आहे, त्यामुळे भाविकांना अधिक सोयीस्कर सेवा देता येईल.
---
आधुनिकतेचा समन्वय
नाशिक येथील तीर्थपुरोहितांनी जपलेल्या वंशावळी, ताम्रपट आणि धार्मिक विधींचे ज्ञान हा तीर्थक्षेत्राचा महत्त्वाचा सांस्कृतिक ठेवा आहे. हा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविताना आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षित दस्तावेजीकरण, सुलभ संपर्कव्यवस्था आणि भाविकाभिमुख सेवा यांची सांगड घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्याचा प्रसंग नसून, तीर्थपुरोहितांच्या ऐतिहासिक योगदानाचे महत्त्व अधोरेखित करण्याची संधीही आहे. परंपरेचे जतन, संघटनात्मक बळकटी आणि आधुनिक सुविधांचा समन्वय साधून पुरोहित संघाची भूमिका सिंहस्थाच्या व्यवस्थेत अधिक महत्त्वपूर्ण ठरण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत.
---कोट
सिंहस्थाच्या तयारीत स्वच्छता, सुरक्षितता आणि धार्मिक परंपरांचा सन्मान यांचा समतोल राखणेही आवश्यक आहे. या काळात वाढणाऱ्या भाविकसंख्येचा विचार करून धार्मिक विधींचे नियोजन आणि माहिती व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याची संधी आहे.
- सतीश शुक्ल, अध्यक्ष,
कुंभमेळा समिती, पुरोहित संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.