पान दोन मेन
----------------------
15118
नाशिक : पूर्व प्रभाग सभेत प्रश्न उपस्थित करताना नगरसेविका जागृती गांगुर्डे.
आंदोलनाच्या इशाऱ्यानंतरच अधिकारी कामे काम करता
पूर्व प्रभाग सभेत नगरसेवकांचा संताप; अपुऱ्या सुविधांमुळे अधिकारी, कारभाराविरुद्ध सभा बहिष्काराचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. २९ : पाणीपुरवठा असो अथवा अन्य कुठलीही कामे; वारंवार सभागृहात प्रश्न उपस्थित करून किंवा अधिकाऱ्यांना सांगून कामे होत नाहीत. मात्र, कामांच्या मागणीसाठी प्रभाग सभेत आंदोलनाचा इशारा देताच कामे केली जातात. याचा अर्थ काय? धमकी दिल्यावरच कामे होणार का? असा प्रश्न नगरसेविका आशा तडवी यांनी उपस्थित करत महापालिका अधिकाऱ्यांच्या बे भरोसे कारभाराविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली.
नाशिक महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीची बैठक सभापती मंगला नन्नावरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत विविध समस्यांवरून नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले होते. अधिकाऱ्यांमध्ये आपापसांत समन्वय नसल्याने कामांची जबाबदारी एकमेकांवर ढकलली जात असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. पूर्वसूचना न देता सोसायट्यांच्या प्रवेशद्वारांसमोरील रस्ते खोदून ठेवल्याने रहिवाशांची मोठी अडचण होत आहे. मला स्वतःला प्रभाग सभेला येण्यासाठी घरून गाडी काढता न आल्याने रिक्षाने यावे लागले, असे सांगत तडवी यांनी खोदकामापूर्वी पूर्वसूचना देण्याची मागणी केली. तसेच प्रभागात मागणी करूनही पाण्याचा टँकर वेळेवर येत नाही आणि महापालिकेचे टँकरचालक पैसे घेऊन इतर सोसायट्यांना पाणीपुरवठा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
नगरसेविका सीमा पवार यांनीही आक्रमक पवित्रा घेत टँकरच्या तुटवड्याचा आणि प्रभाग १५ मधील दुरवस्थेचा मुद्दा लावून धरला. साधूग्रामकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून परिसरात डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसेल, ती पकडून थेट सभागृहात सोडली जातील, असा इशारा त्यांनी दिला. तसेच प्रश्न सुटत नसतील तर यापुढे सभेस हजर राहणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.
ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत खोडे यांनी सभेत मांडलेली कामे होत नसतील आणि अधिकारी उपस्थित राहत नसतील तर प्रभाग सभा बरखास्त करा. अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा ठराव करा, अशी आक्रमक भूमिका घेतली. नगरसेविका सामिया खान यांनीही सारडा सर्कल येथील अतिक्रमणाचा आणि इतर रखडलेल्या कामांचा प्रश्न मांडत, कामे झाली नाहीत तर सभेला उपस्थित न राहता सर्व प्रश्न थेट महापौरांकडे मांडू, असा इशारा दिला.
नगरसेविका जागृती गांगुर्डे यांनी प्रभाग १४ मध्ये ''अमृत'' योजनेअंतर्गत कोणतीही कामे होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. अधिकाऱ्यांना फोन केल्यावरच पाणी सुटते, तसेच पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळत असूनही महापालिकेकडून कारवाई केली जात नाही, असे त्या म्हणाल्या.
---
अधिकाऱ्यांची कानउघडणी
सभेच्या अखेरीस सभापती मंगला नन्नवरे यांनी निष्काळजी अधिकाऱ्यांना चांगलेच खरे-खोटे सुनावले. आदेश देऊनही कामे केली जात नाहीत. लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आणि सभेला कोणी आले नाही, तर आपण सर्वांनाच घरी बसावे लागेल, असे सुनावत त्यांनी सर्व सदस्यांनी मांडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे कडक निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.