फोटो : 31205
नाशिक : रिंगरोड संदर्भात पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देताना करण गायकर व शेतकरी.
…
रिंगरोड बाधितांची आज ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने निर्णय; आत्मदहन आंदोलन स्थगित
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २ : नाशिक रिंगरोड बाधित शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि भूसंपादनातील गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शनिवारी (ता.३) मुंबई येथील ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तातडीची बैठक होणार आहे.
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने हा निर्णय झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणारे आत्मदहन आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आल्याची घोषणा शेतकरी प्रतिनिधींनी केली. पालकमंत्री महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत रिंगरोड बाधित शेतकऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी आमदार देवयानी फरांदे, छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर आणि शेतकरी उपस्थित होते.
रिंगरोडच्या अलाइनमेंटबाबत अद्याप ठोस निर्णय नसणे, जिरायती व बागायती जमिनींचे योग्य मूल्यांकन न करणे, मंजूर दर परस्पर कमी करणे तसेच विविध आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करणे, या मुद्द्यांवर बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
शेतकऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नांची गंभीरता लक्षात घेऊन पालकमंत्री महाजन यांनी तत्काळ मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत संपूर्ण वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी मुंबईत तातडीची बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.
बैठकीस विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुंभमेळा आयुक्त, पोलिस आयुक्त, ग्रामीण पोलिस अधीक्षक, संबंधित सातही तालुक्यांचे प्रांताधिकारी तसेच एमएसआयडीसी, नगररचना, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे व पुराव्यांसह उपस्थित राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. यावेळी नगरसेवक सुधाकर बडगुजर, नगरसेवक विश्वास नागरे, माजी नगरसेवक जगदीश पाटील, शेतकरी प्रतिनिधी दीपक हगवणे, सुदर्शन पाटील, पंकज खताळे, सुदाम भावले, रवी पेखळे, सागर लोणे, प्रवीण पाटील, वैभव दळवी, विनायक डेमसे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.