१५ वा लेख
-------------------
आता सेकंड होम नाशिकलाच..!
--------------------
नाशिक आता केवळ द्राक्षांची आणि कुंभमेळ्याची नगरी राहिलेली नाही, तर ती मुंबई-पुण्याच्या धावपळीपासून दूर, शांत आणि निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या ''सेकंड होम''ची राजधानी बनत चालली आहे. मुंबई, ठाणे, पुण्यातील नोकरदार वर्ग, धुळे-जळगाव-नंदुरबार-नगर-अहिल्यानगर पट्ट्यातील व्यापारी कुटुंबे आणि अगदी गुजरात, राजस्थान, दिल्लीतील गुंतवणूकदारही नाशिकमध्ये सेकंड होम म्हणून फ्लॅट, रो-हाऊस, व्हिला आणि शेतजमिनीत गुंतवणूक करत आहेत.
- विक्रांत मते
सन २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकमध्ये पायाभूत सुविधांचा प्रचंड विकास होत आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळ्याला लोटलेला भाविकांचा महासागर लक्षात घेऊन नाशिक-त्र्यंबकेश्वर मध्येही दहापट भाविकांची गर्दी होईल असा अंदाज बांधतं शासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार कुंभमेळ्याची तयारी सुरू आहे. एक, दोन हजार कोटी नव्हे तर तब्बल ३५ हजार कोटी रुपयांची पायाभूत विकासाची कामे नाशिक व त्र्यंबकेश्वर तसेच शिर्डी, ओझर, भीमाशंकर येथे शासनाने सुरू केली आहेत. मार्च २०२७ पर्यंत कामे पूर्ण होतील असा विश्वास शासन यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आला आहे. पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाचे साधुग्राम, रस्ते रुंदीकरण, गोदाघाटांचा विकासावर हजारो कोटींची गुंतवणूक होत आहे. अनेक भाविक कुटुंबे कुंभाच्या निमित्ताने येथे कायमचे एक छोटे घर असावे म्हणून गुंतवणूक करतील असे बोलले जात आहे. छोट्या घरासाठी तशी विचारणा देखील होत आहे. धार्मिक आणि भावनिक गुंतवणूक म्हणूनही नाशिकला पसंती मिळत आहे.
महामार्गांचे विस्तारणारे जाळे
समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नाशिक हे अंतर आता केवळ तीन ते साडेतीन तासांवर आले आहे. पुणे-नाशिक महामार्गाचे काम, नाशिक-चेन्नई ग्रीन कॉरिडॉर आणि इगतपुरी-त्र्यंबकेश्वर परिसरातील विकासामुळे कनेक्टिव्हिटी प्रचंड सुधारली आहे. शुक्रवारी मुंबईहून निघून आठवडाभर नाशिकमध्ये राहून सोमवारी परत जाणे आता सहज शक्य झाले आहे. वाढवण बंदरामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. विशेष करून लॉजिस्टीक व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढतं असून जागांचे भाव वाढले आहे. वाढवण ते समृद्धी महामार्ग (घोटी) असा ११८ किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे उद्योगांच्या केंद्रस्थानी नाशिक आले आहे. म्हणूनच आडवण, दिंडोरी येथे शासनाने औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून क्षेत्र घोषित केले आहे. ठाणे, मुंबईहून भिवंडी, कल्याण, शहापूर या भागात यायचे झाल्यास साडे तीन ते चार तासांचा कालावधी लागतो असा येथील नागरिकांचा अनुभव आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाला लागून असलेल्या घोटी, इगतपुरी भागात जागा घेऊन घर बांधल्यास भिवंडी, कल्याण येथे अवघ्या दीड तासात पोहोचता येते. यातून वेळ वाचतो शिवाय शांततेत जीवन व्यतित करता येते हा अनुभव नागरिकांचा असल्याने या भागात घरे घेण्याकडे कल वाढला आहे.
वाहतूक व्यवस्था
नाशिकचा बाजारपेठेचा भाग सोडला तर सर्वत्र रुंद रस्ते आहेत. परंतु आता मॉल संस्कृती विस्तारल्याने हा विषय राहिला नाही. गेटेड कम्युनिटी मध्ये तर ईमारतींमध्येचं मॉल तयार होत असल्याने ग्राहकांना बाजारपेठेत जाण्याची आवश्यकता राहिली नाही. राहिला प्रश्न तो वाहतुकीचा नाशिक मध्ये मेट्रोची तयारी सुरू झाली आहे. मुंबईला जायचे ठरल्यास रस्ते मार्ग तर आहेच त्या शिवाय आता ओझर विमानतळावरून देशांतर्गत वाहतुक सुरू झाली आहे. दिल्ली, अहमदाबाद, इंदौर, कोलकाता, बेंगलुरू या शहरांमध्ये नाशिकहून हवाई मार्गे सहज पोहोचता येते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने ओझर टर्मिनल व पार्किंगचे विस्तारीकरण होत असल्याने त्याचाही लाभ नाशिकला मिळेल. कुंभाच्या निमित्ताने नाशिकरोड व देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण होत आहे. ओढा हे नवीन रेल्वे स्थानक तयार होत आहे. नाशिक-पुणे रेल्वे मार्गाची घोषणा झाली आहे.
हवामान आणि जीवनशैली
मुंबई-पुण्याच्या तुलनेत प्रदूषणमुक्त हवा, त्र्यंबकेश्वर, वणी, शिर्डी हि धार्मिक स्थळे शहरापासून नजीकच्या अंतरावर सापुतारा हिल स्टेशन जवळ, वाइन टुरिझम, मिसळ आणि शेती-पर्यटन यामुळे नाशिक ''वर्क फ्रॉम सेकंड होम''साठी आदर्श बनले आहे. कोरोनानंतर लोकांना मोकळ्या हवेत मोठे घर हवे आहे, ही मानसिकता नाशिकच्या पथ्यावर पडली आहे. मुंबई, ठाणे व पुणे शहरात प्रदूषणाची पातळी घसरतं चालली आहे. वाहतूक ठप्प होणे असो कि ध्वनी प्रदूषणामुळे आता मोकळ्या जागेत श्वास घेणे पसंत केले जातात. त्याचा परिणाम नाशिक मध्ये सेकंड होमला पसंती दिली जात आहे. नाशिक मध्ये छोटी-मोठी २७ धरणे आहेत. शेत जमीन मुबलक प्रमाणात आहे. रुंद रस्ते, महामार्गांचे पसरलेले जाळे यामुळे शांत जीवन जगण्यासाठी नाशिकला पसंती मिळतं आहे. पर्यटनासाठी किल्ले, धरणांची सफर, धबधबे, आदिवासी भागातील जीवनशैलीचा आनंद घेण्याची संधी, पेठ, सुरगाणा, हरसूल या भागात पावसाळ्यात फुलणारे निसर्गाचे सौंदर्य याचा विचार आता नाशिक मध्ये घर घेताना केला जात आहे.
परवडणारी गुंतवणूक
मुंबईत वन बीएचकेसाठी मोजावे लागणारे ८० लाख ते १ कोटी रुपयांमध्ये नाशिकमध्ये मुंबई-आग्रा महामार्ग, त्र्यंबक रोड, गंगापूर रोड, आडगाव-ओझर परिसरात टू बीएचके फ्लॅट किंवा प्लॉटसह रो-हाऊस मिळतो. भाड्याने दिल्यास महिन्याला १५ ते २५ हजारांचे उत्पन्न आणि दरवर्षी १० ते १५ टक्के दरवाढ, यामुळे दुहेरी फायदा होत आहे. मुंबई, ठाण्यात एवढ्याचं किमतीला एक घर मिळते तेथे नाशिक मध्ये स्वतंत्र बंगलो किंवा फार्म हाउस तयार होऊ शकते. याचा अधिक विचार केला जात आहे.
शिक्षण, आरोग्य आणि उद्योग
नाशिकमधील नामांकित शाळा, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स, औद्योगिक वसाहतीतील नोकरीच्या संधी यामुळे केवळ सेकंड होम नाही, तर भविष्यातील फर्स्ट होम म्हणूनही अनेकजण याकडे पाहतं आहेत. रिअल इस्टेटला सुगीचे दिवस या वाढत्या मागणीचा थेट परिणाम रिअल इस्टेट क्षेत्रावर झाला आहे. क्रेडाई नाशिकच्या अंदाजानुसार, गेल्या दोन वर्षांत सेकंड होमच्या मागणीत ३५ ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
-----------------------
बाजारातील प्राथमिक अंदाजानुसार सेकंड होम खरेदीदारांचा आलेख असा-
- मुंबई, ठाणे, पालघर पट्टा- ४५ टक्के- सर्वात मोठा वाटा. आयटी, बँकिंग क्षेत्रातील अधिकारी, व्यावसायिक.
- पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र- २० टक्के- वाईनरी आणि शांत निवृत्तीसाठी.
- उत्तर महाराष्ट्र (धुळे, जळगाव, नंदुरबार)- १५ टक्के- मुलांच्या शिक्षणासाठी आणि व्यापारी स्थलांतर.
- परराज्य (गुजरात, राजस्थान, दिल्ली) आणि एनआरआय- १० टक्के- कुंभ आणि गुंतवणूक म्हणून.
स्थानिक नाशिककर- १० टक्के- गुंतवणूक म्हणून दुसरे घर. या व्यवहारामुळे केवळ बिल्डरलाच नाही, तर रजिस्ट्री, बँकिंग, इंटेरियर, फर्निचर, पर्यटन या सर्व क्षेत्रात आर्थिक उलाढाल वाढली आहे. एका अंदाजानुसार, नाशिकच्या रिअल इस्टेटमध्ये सेकंड होममुळे वार्षिक ३००० ते ४००० कोटींची अतिरिक्त उलाढाल होत आहे. थोडक्यात, महामार्गाने अंतर कमी केले, कुंभाने श्रद्धा जोडली आणि हवामानाने मन जिंकले. त्यामुळे ''फर्स्ट होम कुठेही असो, सेकंड होम नाशिकलाच.'' हे ब्रीद होत आहे.
------------------------------------..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.