प्रचंड मागणीमुळे शहरात मिठाईचा तुटवडा
‘एफडीए’ कारवाईचा परिणाम; खरेदीला नागरिकांची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ८ : दिवाळीचा गोडवा वाढविण्यासाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर गोडधोड पदार्थांची खरेदी करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनातर्फे धडक कारवाई सुरू असल्याने बनावट खवा व मिठाईला काही प्रमाणात प्रतिबंध लागल्याने, व मागणीत अचानक मोठी वाढ झाल्याने अक्षरशः शहरात मिठाईचा तुटवडा निर्माण झाला होता.
शहरातील काही नामांकित मिठाई विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये दुपारपर्यंत संपूर्ण माल विक्री झाला होता. त्यामुळे अनेक ग्राहकांना इतर पर्यायी दुकानांमधून खरेदी करावी लागली. लक्ष्मीपूजनाच्या पारंपरिक पूजेतील व्यंजनांमध्ये मिठाईचे महत्त्वाचे स्थान आहे. कार्यालय, दुकान, व्यवसाय, उद्योगात विधिवत पूजन करताना पेढा, मिठाई वाटण्याची प्रथा आहे. याशिवाय आप्तस्वकीय, मित्र परिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा देताना मिठाई भेट दिली जाते. या पार्श्वभूमीवर कालपासूनच मिठाई खरेदीसाठी गर्दी झाली होती. जुने नाशिक, सिडकोसह कॉलेज रोड आदी भागांमध्ये असलेल्या नामांकित मिठाई विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये मालाचा तुटवडा निर्माण झाला होता. सामान्यतः मागणीच्या तुलनेत मिठाईची खरेदी दुप्पट झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. या तुटवड्याचा फायदा छोट्या व्यावसायिकांना झाला. व त्यांच्याकडील मालाला मागणी वाढली होती. राज्यस्तरावर गेल्या काही कालावधीपासून अन्न व औषध प्रशासनाकडून सातत्याने कारवाई सुरु आहे. त्यामुळे बनावट पदार्थ बाजारपेठेत दाखल करणे कठीण जात असल्याने मिठाईच्या तुटवड्यामध्ये भर पडते आहे.
---चौकट
फराळ खरेदीची लगबग
रेडीमेड फराळ खरेदीची लगबग सुरुच होती. चकल्या, लाडू, अनारसे, शेव असे गोड-तिखट पदार्थ खरेदी केले गेले. याशिवाय सोनपापडी व इतर पाकीट बंद पदार्थांनाही मोठी मागणी झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.