फोटो : B05082
पंचवटी : पाणीपुरवठ्याची प्रत्यक्ष पाहणी करताना नागरिकांच्या तक्रारी जाणून घेताना आमदार प्रा. देवयानी फरांदे. सोबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी.
--
गंगापूर रोडचा जलकुंभ प्रथम भरण्याचे आदेश
पाणीपुरवठ्याच्या विस्कळीत नियोजनावरून आमदार फरांदे आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : माणिकनगर परिसरातील पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येवरून आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले असून, गंगापूर रोड परिसरातील जलकुंभ सर्वप्रथम भरण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत.
प्रभाग क्रमांक ७ मधील माणिकनगर येथील शिवसत्य क्रीडा संकुल परिसरात महापालिकेने नव्याने जलकुंभ बांधला आहे. मात्र, या लाभक्षेत्रातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून अपुऱ्या दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारीनंतर आमदार फरांदे, नगरसेविका स्वाती भामरे आणि नगरसेवक सुरेश पाटील यांनी प्रत्यक्ष परिसराची पाहणी केली. या वेळी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता साळी उपस्थित होते. आमदार फरांदे यांनी परिसरातील अनेक घरांमध्ये जाऊन नळाला येणाऱ्या पाण्याचा दाब प्रत्यक्ष तपासला. पाण्याचे मीटर काढून पाहणी केली असता, अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांकडून खुलासा मागितला. टाकीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीचे दोन महिने टाकी नियमित भरली जात होती, मात्र नंतर सातपूर विभागातील टाक्या प्रथम भरल्या जात असल्याने माणिकनगरची टाकी पूर्ण क्षमतेने भरली जात नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
--चौकट
विसंगती खपवून घेणार नाही
महापालिकेच्या धोरणानुसार दूरच्या टाक्या आधी भरणे अपेक्षित असताना उलट प्रक्रिया होत आहे. नागरिकांना पाणी मिळत नसताना टाकी भरण्याच्या क्रमातील ही विसंगती खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दांत आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. शहरासाठी पुरेसे पाणी उपलब्ध असतानाही केवळ नियोजनाअभावी नागरिकांना वंचित राहावे लागत असेल तर ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांना नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या पाहणी दौऱ्यामुळे माणिकनगर, गंगापूर रोड परिसरातील पाणीप्रश्न लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.