फोटो -NSK26H32573
नाशिक : राष्ट्रीय जाहिरात दिन कार्यक्रमप्रसंगी ‘नावा’चे पदाधिकारी अमोल कुलकर्णी, दिलीप निकम, गणेश नाफडे, नितीन शेवाळे, शाम पवार, दीपक जगताप, किशोर खैरनार, मोतीराम पिंगळे, नितीन राका, विठ्ठल राजोळे, विठ्ठल देशपांडे आदी.
''नावा''तर्फे जाहिरात दिन उत्साहात साजरा
----------------------------------
पाणी बचतीचा संदेश देत जपली सामाजिक बांधिलकी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : जाहिरात ही केवळ उत्पादनांची किंवा सेवांची माहिती देणारे माध्यम नसून, समाजमन घडविण्याची आणि जनजागृती करण्याची प्रभावी शक्ती आहे. याच जाणिवेतून राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त नाशिकमध्ये विविध माध्यमांच्या कार्यालयांत जाहिरात दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नाशिक ॲडव्हर्टायझिंग अँड वेल्फेअर असोसिएशनच्या (नावा) पदाधिकाऱ्यांना विविध वृत्तपत्रांच्या तसेच एफएम कार्यालयांत निमंत्रित करून केक कापण्यात आला.
याप्रसंगी फेडरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग आंत्रप्रुनर्स (फेम) चे अध्यक्ष रवी पवार यांनी जाहिरात व्यवसायाच्या बदलत्या स्वरूपावर आणि या क्षेत्रातील संधींवर विचार व्यक्त केले. जाहिरात व्यवसाय हा विविध माध्यमे, जाहिरातदार, ग्राहक आणि व्यावसायिक यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. काळानुसार जाहिरातींची माध्यमे आणि सादरीकरणाची पद्धत बदलत असली, तरी योग्य संदेश योग्य व्यक्तीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे जाहिरातीचे महत्त्व कायम आहे, असेही पवार यांनी नमूद केले. विविध माध्यमांच्या कार्यालयांत झालेल्या या उपक्रमामुळे जाहिरात क्षेत्रातील पदाधिकारी आणि वृत्तपत्र प्रतिनिधींमध्ये संवादाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी ‘नावा’चे अध्यक्ष अमोल कुलकर्णी, सरचिटणीस दिलीप निकम, उपाध्यक्ष गणेश नाफडे, सहचिटणीस नितीन शेवाळे, जनसंपर्क संचालक शाम पवार, ‘फेम’चे सदस्य दीपक जगताप, किशोर खैरनार यांच्यासह संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, माजी अध्यक्ष नितीन राका, विठ्ठल राजोळे, विठ्ठल देशपांडे उपस्थित होते.
इन्फो...
‘नावा’ने जपली बांधिलकी
राष्ट्रीय जाहिरात दिनाच्या निमित्ताने पाणी बचतीचा संदेश देण्याचा उपक्रम विशेष महत्त्वाचा ठरला. पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान असून, त्याचा काटकसरीने वापर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जाहिरातींच्या माध्यमातून अशा सामाजिक विषयांवर जनजागृती करता येते. त्यामुळे जाहिरात क्षेत्राने व्यावसायिक उद्दिष्टांसोबतच समाजहिताच्या संदेशांनाही प्राधान्य द्यावे, हा या उपक्रमामागील विचार होता.