घटस्थापनेच्या चैतन्याने आजपासून नवरात्रोत्सवाचा जागर
देवीच्या आराधनेसह बाजारपेठेतही तेजी; उत्सवाची तयारी जोरात
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १० : शक्तीची उपासना, भक्तीचा जागर आणि उत्साहाचा रंग घेऊन रविवारी (ता. ११) शारदीय नवरात्रोत्सवाचे आगमन होत आहे. घटस्थापना, देवीची विधिवत पूजाअर्चा, आरती, उपवास, भजन-कीर्तन, दांडिया आणि गरब्याच्या तालावर नऊ रात्री जागविण्याची तयारी शहरात सुरू झाली आहे. पितृपक्ष संपल्यानंतर सुरू होणाऱ्या या उत्सवामुळे धार्मिक वातावरणासोबतच बाजारपेठेतही चैतन्य निर्माण झाले आहे. दुचाकी, चारचाकी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह विविध वस्तूंच्या खरेदी आणि बुकिंगकडे ग्राहकांचा कल वाढणार आहे.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना करून देवीचे आवाहन केले जाते. मातीच्या वेदीवर धान्य पेरून त्यावर कलशाची स्थापना, अखंड नंदादीप, दुर्गासप्तशतीचे पठण, देवीची आरती आणि नैवेद्य अशा धार्मिक विधींनी उत्सवाची सुरुवात होते. अनेक घरांमध्ये नऊ दिवस उपवास, नामस्मरण आणि पारायणाचे नियोजन करण्यात आले आहे. मंदिरांमध्येही फुलांची सजावट, विद्युत रोषणाई आणि विशेष पूजेची तयारी सुरू आहे. शहरातील कालिका माता मंदिरातील नवरात्रोत्सव आणि यात्रेकडे भाविकांचे विशेष लक्ष लागले आहे. यात्रेच्या निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी, पूजासाहित्य, फुले, नारळ, प्रसाद आणि विविध वस्तूंच्या खरेदीमुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण होणार आहे. सप्तशृंगगडावरील आदिमायेच्या दर्शनासाठीही भाविकांची लगबग वाढली आहे. देवीच्या आराधनेतून शक्ती, संयम आणि सकारात्मकतेचा संदेश देणाऱ्या या पर्वामुळे नाशिकमध्ये पुढील नऊ दिवस भक्तिमय आणि उत्साही वातावरण अनुभवायला मिळणार आहे.
---
बाजारपेठेला खरेदीचा आधार
नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करण्याला अनेक कुटुंबांमध्ये महत्त्व दिले जाते. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या शोरूममध्ये चौकशी व बुकिंग, तसेच दूरचित्रवाणी, फ्रिज, वॉशिंग मशीन, मोबाईल आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो. सणासुदीच्या काळात मिळणाऱ्या सवलती, आकर्षक योजना आणि वित्तपुरवठ्याच्या पर्यायांमुळे ग्राहक खरेदीचे नियोजन करतात. दुसरीकडे, दांडिया-गरब्यासाठी पारंपरिक पोशाख, दागिने, पादत्राणे आणि पूजा साहित्याच्या खरेदीलाही महत्त्व आले आहे. विविध मंडळांकडून गरबा-दांडिया कार्यक्रमांची तयारी केली जात असून, तरुणाईसह महिलांमध्ये या कार्यक्रमांविषयी उत्सुकता आहे.
---
कालिका माता यात्रोत्सवाची जय्यत तयारी
नवरात्रोत्सवात नाशिकसह पंचक्रोशीतील लाखो भाविक कालिका मातेच्या दर्शनासाठी येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे दर्शन, वाहतूक आणि स्वच्छता व्यवस्थेची कसोटी लागणार आहे. २४ तास दर्शनासह भाविकांसाठी पाच कोटींचे विमा कवच दिले आहे. ११ ऑक्टोबरपासून २० ऑक्टोबरपर्यंत कालिका माता मंदिर परिसरात नवरात्रोत्सवाची धामधूम असणार आहे. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा, सशुल्क दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था आहे. सुमारे ५०० स्वयंसेवक, फिरती स्वच्छतागृहे आणि आपत्कालीन आरोग्यसेवेची व्यवस्था असणार आहे. गडकरी सिग्नल ते रुची हॉटेलदरम्यानचा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद असून, चांडक सर्कल ते हॉटेल संदीपदरम्यान दुचाकी वगळता अन्य वाहनांना प्रवेशबंदी आहे. महामार्ग बसस्थानकासह पर्यायी ठिकाणी पार्किंगचे नियोजन आहे.
---
घटस्थापनेचा मुहूर्त
नाशिक : रविवार, ११ ऑक्टोबर २०२६
घटस्थापनेचा सकाळचा मुहूर्त : सकाळी ६.२८ ते १०.२४
अभिजित मुहूर्त : सकाळी ११.५८ ते दुपारी १२.४५
प्रतिपदा तिथी : ११ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ९.३२ पर्यंत.
---कोट
घटस्थापना म्हणजे आदिशक्तीचे आवाहन करून नऊ दिवस तिची उपासना करण्याचा संकल्प. पूजेमध्ये केवळ मुहूर्ताला नव्हे, तर शुचिर्भूतता, श्रद्धा, संकल्प आणि मनोभावे केलेल्या उपासनेला महत्त्व आहे. प्रत्येकाने आपल्या कुलाचारानुसार आणि पंचांगाच्या मार्गदर्शनानुसार पूजा करावी.
-गणेश बुवा, वेदाचार्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.