मेन
फोटो : B17894
नाशिक रोड : कल्याणकारी महामंडळासाठी वृत्तपत्र विक्रेत्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर काढलेला मोर्चा.
--
स्वतंत्र कल्याणकारी मंडळासाठी वृत्तपत्र विक्रेत्यांचा एल्गार
प्रलंबित मागण्यांसाठी विभागीय आयुक्तालयासमोर भव्य मोर्चा
नाशिक रोड, ता.९ : राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी मंजूर झालेल्या स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी कल्याणकारी मंडळाची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, या मुख्य मागणीसाठी शुक्रवारी (ता ९) महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना, नाशिक रोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेसह वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्था नवीन नाशिक (सिडको), नाशिक जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना, नाशिक शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना व सातपूर वृत्तपत्र विक्रेता संघटना या संघटनांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी भव्य मोर्चा काढून विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने १० ऑक्टोबर २०२४ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्यानंतर ११ मार्च २०२६ रोजीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही माहिती व जनसंपर्क मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी पुढील अधिवेशनापूर्वी हे मंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही या मंडळाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नसल्याने विक्रेत्यांमध्ये असंतोष आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी संपूर्ण राज्यभरात महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांवर हे मोर्चे काढले असून नाशिकमधील संघटनांनी विभागीय कार्यालयात निवेदन देऊन मागण्यांविषयी सरकारला आठवण करून दिल्याचे आंदोलकांनी सांगितले. या मोर्चाचे नेतृत्व नाशिक रोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील मगर, विभागीय संघटना सचिव महेश कुलथे, नाशिक शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, जिल्हाध्यक्ष तथा वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्था नवीन नाशिकचे दत्ता ठाकरे आणि सातपूर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष राजू अनमोला यांनी केले. ज्ञानेश्वर धात्रक, महेश मणियार, ज्योती जगताप, दीपक गोसावी, पंकज भदाणे, उमेश जोशी, शरद टिळे, किशोर सोनवणे, विजय सोनार, अनिल कुलथे, वसंत घोडे, उल्हास कुलथे, चंद्रकांत रहाडे, रवी सोनवणे, बाळासाहेब सूर्यवंशी, संजय शेलार, बाळकृष्ण नेर, सचिन बागुल, संदीप मडवई, सचिन वरंदळ, शरद पावशे, संदीप जाधव, पुरुषोत्तम कोर, संदीप चौधरी आदींसह असंख्य विक्रेते मोर्चात सहभागी झाले होते.
----
प्रमुख मागण्या
- मंत्रिमंडळ निर्णयानुसार स्वतंत्र कल्याणकारी मंडळ प्रत्यक्ष व तातडीने सुरू करावे.
- मंडळाच्या विविध योजना सुरळीत चालवण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करावी
- कष्टकरी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी आरोग्य विमा, अपघात विमा आणि निवृत्तिवेतन योजना लागू कराव्यात.
- राज्यातील सर्व अधिकृत वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी.
----------कोट
शासनाने १० ऑक्टोबर २०२४ रोजी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला, परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे विक्रेत्यांना दिलासा मिळण्याऐवजी प्रतीक्षाच करावी लागत आहे.
- सुनील मगर, अध्यक्ष, नाशिक रोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्था
----------कोट
कल्याणकारी मंडळासाठी राज्यभरातील विक्रेते अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीअभावी या अपेक्षा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. स्वतंत्र निधी, प्रभावी यंत्रणा आणि विक्रेत्यांच्या नोंदणीची प्रक्रिया निश्चित करणे आवश्यक आहे.
- महेश कुलथे, विभागीय संघटन सचिव, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना
---------कोट
कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून वृत्तपत्रविक्रेत्यांना आरोग्य विमा, अपघात विमा आणि निवृत्ती वेतनासारख्या योजना लागू होणे गरजेचे आहे. शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून मंडळाची अंमलबजावणी तातडीने करावी.
- चंद्रकांत पवार, अध्यक्ष, नाशिक शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना
-----------कोट
वृत्तपत्र विक्रेत्यांना सामाजिक आणि आर्थिक संरक्षण देण्याची जबाबदारी शासनाने स्वीकारली पाहिजे. कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय होऊनही त्याची अंमलबजावणी रखडणे ही विक्रेत्यांसाठी चिंतेची बाब आहे.
- दत्ता ठाकरे, जिल्हाध्यक्ष, वृत्तपत्र विक्रेता संघटना.
----------कोट
वृत्तपत्र विक्रेत्यांच्या श्रमांचा विचार करून कल्याणकारी मंडळाची घोषणा प्रत्यक्ष कृतीत आणणे आवश्यक आहे. पुरेसा निधी उपलब्ध करून आरोग्य व अपघात विमा आणि पेन्शन योजना लागू केल्यास हजारो विक्रेते व त्यांच्या कुटुंबांना आधार मिळू शकतो.
- राजू अनमोला, अध्यक्ष, सातपूर वृत्तपत्र विक्रेता संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.