धुळे : टुडे पान ४ साठी..
--
निजामपूर येथे अन्न व्यावसायिकांची कार्यशाळा
--
भेसळ प्रतिबंधावर मार्गदर्शन; ३५० व्यावसायिकांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २४ : अन्न व औषध प्रशासन यांच्या वतीने निजामपूर (ता. साक्री) येथील वाणी समाज मंगल कार्यालयात अन्न व्यावसायिकांसाठी आयोजित करण्यात आलेली एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत परिसरातील ३५० विविध अन्न व्यावसायिकांनी सहभाग नोंदवला.
प्रारंभी अन्न व औषध प्रशासन येथील सहायक आयुक्त (अन्न) गोपाल माहोरे यांनी ‘अन्न सुरक्षा व मानके कायदा : २००६’ अंतर्गत आवश्यक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत मार्गदर्शन केले. सुरक्षित अन्न पुरवठा, ग्राहकांचा विश्वास आणि दर्जेदार व्यवसायासाठी शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच, सर्वसाधारणपणे आढळणारे भेसळीचे प्रकार, भेसळ ओळखण्यासाठी उपलब्ध शास्त्रीय चाचण्या आणि सोप्या प्राथमिक तपासणी पद्धतींबाबत माहिती दिली. यासोबतच स्वच्छता, वैयक्तिक आरोग्य, सुरक्षित उत्पादन प्रक्रिया, नोंदींचे व्यवस्थापन आणि कायदेशीर पालन या विषयांवर मार्गदर्शन केले.
व्यापारी असोसिएशनच्या वतीने नितीन बंब आणि किशोर जैन यांनी मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले. अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त माहोरे, अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, शशिकांत राणे, अरविंद राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले. निजामपूर परिसरातील अन्न व्यावसायिक संघटनेचे विजय रेलन, प्रवीण शहा, दिलीप गोपाळ आणि संदीप चिंचोले यांनी सहकार्य केले. भविष्यातही अशा तांत्रिक व जनजागृतीपर कार्यशाळा आयोजित केल्या जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले.