नाशिक/सिन्नर : नगर परिषदेच्या हद्दीत मोडणाऱ्या कानडी मळ्यातील गुंठेवारी नियमितीकरण्यासाठी पालिकेने या भागातील मालमत्तांचे तत्काळ सर्वेक्षण करावे व महसूल विभागाने गुंठेवारीने व्यवहार झालेल्या शेतीची मानीव बिनशेती (४२ ब) करण्यासाठी कार्यवाही सुरू करावी, अशी सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी तहसीलदार राहुल कोताडे व मुख्याधिकारी संजय केदार यांना केली. तसेच गुंठेवारी नियमितीकरणाचा प्रस्ताव सात दिवसांत विशेष बाब म्हणून शासनाकडे पाठवावा, असेही सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून कानडी मळा परिसरातील नागरिकांचा जिव्हाळ्याचा या प्रश्नासाठी तहसीलदार कार्यालयात प्रांताधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या.
कानडी मळा भागात नागरिकांनी गुंठेवारीने शेतीची खरेदी करून त्यावर घरे बांधलेली आहेत. त्यासाठी पालिकेची परवानगी घेतलेली नाही. त्यातच शेतजमिनीचा व्यावसायिक वापर होत असल्याने महसूल विभागाने या भागातील काही मालमत्ताधारकांना दंड आकारून वसुलीसाठी नोटिसा बजावल्या आहेत. नगरसेविका शीतल कानडी यांनी रहिवाशांच्या वतीने कोकाटे यांच्याकडे मालमत्ताधारकांचा प्रश्न मांडला होता. यासाठी कोकोट यांनी बैठक घेतली. या वेळी जिल्हा परिषद सदस्या तथा जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्या सीमंतिनी कोकाटे, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, मुख्याधिकारी केदार, भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक शशिकांत देशमुख, गटविकास अधिकारी एम. बी. मुरकुटे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी पी. एन. बिब्बे आदी उपस्थित होते. तहसीलदार कोताडे यांनी अनधिकृतरीत्या शेतजमिनीचा व्यावसायिक वापर करणाऱ्या रहिवाशांनी दंड भरल्यास त्यांना मानीव बिनशेती (४२ ब नुसार) दाखला देण्यात येईल. त्यांना स्वतंत्र बिनशेती करण्याची गरज भासणार नाही. हा मुद्दा फक्त जमिनीच्या व्यवहाराशी संबंधित असेल. बांधकाम परवानगी मात्र पालिकेकडून घ्यावी लागेल, असे स्पष्ट केले.
पालिकेने सर्वेक्षण करून भूमिअभिलेख कार्यालयाकडून तत्काळ मोजणी करून घ्यावी. पालिकेने प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे प्रयत्न करू, असे आमदार कोकाटे म्हणाले. जागेचा व्यावसायिक वापर करत असलेल्या रहिवाशांनी दंड भरण्यास सहभती दर्शविली. नगरसेविका कानडी यांनी कानडी मळा सिटी सर्व्हेमध्ये वर्ग करण्याची मागणी केली. पालिका अशा मालमत्तांच्या सर्वेक्षणासाठी विशिष्ट पद्धतीने माहिती भरून घेणार आहे. त्यानंतर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठविणार आहे. या वेळी पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील कानडी, गुलाब कानडी, शांताराम उगले, पप्पू कदम, रंगनाथ घोटेकर, सुभाष घोडके, प्रतीक कानडी, ज्ञानेश्वर कहांडळ, माजी नगरसेवक किरण मुत्रक, अनिल वराडे, हरिभाऊ वरंदळ आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
झोपडपट्टी जागेची होणार मोजणी
शहरानजीकच्या झोपडपट्टी जागा नियमितीकरणाबाबतही बैठकीत चर्चा झाली. याबाबतचे नऊ प्रस्ताव आहेत. त्यापैकी पाच प्रस्तावांची मोजणी पालिकेने करवून घेतलेली असून, चार प्रस्ताव भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून घेण्याचे ठरले. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत झोपडपट्टी जागा नियमितीकरण करण्यासाठी गठीत केलेल्या समितीकडे याबाबतचे प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचनाही आमदार कोकाटे यांनी केल्या.
हेही वाचा > ह्रदयद्रावक! अखेरच्या क्षणीही मैत्रीचा घट्ट हात कायम; जीवलग मित्रांच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.