एकदरे–नारपार प्रकल्पाला गती देण्याची मागणी
कादवा कारखान्यातर्फे जलसंपदा मंत्र्यांना साकडे
सकाळ वृत्तसेवा
दिंडोरी ता.३० :- नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भागांचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी एकदरे–वाघाड–करंजवण–ओझरखेड–तिसगाव धरणजोड कालवा, दुष्काळी गावांसाठी उचलपाणी परवानग्या आणि नार–पार नदीचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या प्रकल्पांना गती द्यावी, अशी मागणी कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली.
वाघाड धरणावरील जलपूजन व वार्षिक पाणी नियोजन कार्यक्रमात त्यांनी तीन स्वतंत्र निवेदने दिली.
एकदरे व अन्य वळण योजनांमधून वाघाड धरणात येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा उपयोग करून ते करंजवण, ओझरखेड व तिसगाव धरणांत कालव्याद्वारे वळविण्याची योजना राबवावी. यामुळे मनमाड, चांदवड, दिंडोरी, वणी, येवला व पिंपळगाव, एच.ए.एल. परिसरातील पाणीपुरवठा आणि सिंचनाचा प्रश्न सोडविण्यास मदत होईल. यासाठी तांत्रिक सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. एकदरे धरणातून वाघाडमध्ये उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे नियोजन करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या गरजांना प्राधान्य द्यावे. जाबुंटके, नाळेगाव, रासेगाव, इंदोरे, मडकीजांब, तळेगाव दिंडोरी, शिवनई, खतवड, ढकांबे, जानोरी व वरवंडी आदी दिंडोरी तालुक्यातील दुष्काळी गावांना उचलपाणी परवानग्या देऊन उपसा सिंचन योजना राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
अरबी समुद्राला वाहून जाणारे पार नदीचे अतिरिक्त पाणी वळण योजना व उपसा सिंचनाद्वारे मांजरपाडा योजनेशी जोडून करंजवण आणि पुणेगाव धरणांत आणण्याच्या पर्यायाचे सर्वेक्षण करावे. पुढे पिंगळवाडी परिसरातून अहिवंतवाडी, भातोडा, धोडप किल्ला, हट्टी, चांदवड, नांदगाव व येवला तालुक्यांकडे पाणी पोहोचविण्यासाठी हायलेव्हल कॅनाल चा अभ्यास करावा. तसेच पार व अंबिका – औरंगा खोऱ्यांतील उपलब्ध अतिरिक्त पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविणाऱ्या एकात्मिक नदीजोड प्रकल्पाला गती द्यावी. या योजनांमध्ये दिंडोरी पेठ व सुरगाणा तालुक्यांतील स्थानिक शेतकऱ्यांच्या पाणी गरजांनाही प्राधान्य द्यावे, असे शेटे यांनी निवेदनात म्हटले आहे. संबंधित मागण्यांचा आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.