पाडव्याला रेड्याच्या मिरवणुकीचे आकर्षण
पंचवटी, देवळालीत जोपासली जातेय शेकडो वर्षांची जुनी परंपरा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : दिवाळी सणाला अनेक परंपरा जपण्यात येतात, त्यापैकीच एक म्हणजे बलिप्रतिपदेला अर्थात पाडव्याला वाजतगाजत रेड्याची मिरवणूक काढली जाते. संस्कृती आणि परंपरेत रेड्याला यमाचे वाहन आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे पाडव्याच्या दिवशी त्याचे पूजन करून सुख-समृद्धीची प्रार्थना केली जाते. मंगळवारी (ता. १०) देवळाली तसेच येवला भागामध्ये रेड्याची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
नाशिकमधील अनेक भागांमध्ये, विशेषतः पंचवटी, देवळाली गाव, मनमाड आणि येवला या ठिकाणी ही मिरवणूक काढली जाते. खानदेश भागामध्येदेखील गोठेधारकांतर्फे ही शेकडो वर्षांची जुनी परंपरा मोठ्या उत्साहाने जपली जाते. पाडव्याच्या दिवशी सकाळी रेड्यांना उटणे लावून गरम पाण्याने स्वच्छ आंघोळ घातली जाते. त्यानंतर त्यांच्या अंगावर विविध रंग लावून, वेगवेगळ्या नक्षी आणि चित्रे काढून त्यांना आकर्षक पद्धतीने सजवले जाते. अनेक ठिकाणी या रेड्यांच्या अंगावर सामाजिक जनजागृतीचे संदेश देखील लिहिले जातात. संध्याकाळच्या वेळी ढोल-ताशांच्या आणि लेझिमच्या गजरात या सजवलेल्या रेड्यांची गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते.
--- चौकट
साडेतीन मुहूर्तांपैकी एक
बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी राजा बळीचे पूजन केले जाते. भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण करून राजा बळीकडून तीन पावले भूमी दानात घेतल्याची पौराणिक कथा या सणाशी जोडलेली आहे. पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी पाडव्याला पत्नी-पतीचे औक्षण करते. १० नोव्हेंबरला प्रतिपदा तिथी दुपारी दोनपर्यंत आहे.
---
कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज
दिवाळीचा समारोप भाऊबीजेने होतो. ११ नोव्हेंबरला कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी होईल. या दिवशी बहीण भावाला औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊन तिच्या रक्षणाचे वचन देतो. भाऊबीजेला फराळाची देवाणघेवाण, नातेवाइकांच्या भेटीगाठी आणि स्नेहमेळाव्यांमुळे दिवाळीचा उत्साह अधिकच खुलणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.