एन्कर
अभिजात दर्जा मिळाला, पण पाली भाषेचे जतन अन् संवर्धन कधी?
लीड
पाली ही प्राचीन भारतीय भाषा असून, तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपला उपदेश आणि विचार पाली भाषेत लोकांपर्यंत पोहोचवले. बौद्ध धम्माचा पवित्र ग्रंथ ‘त्रिपिटक’ तसेच भारतीय स्त्रियांच्या आत्मकथनाचा आद्य हुंकार समजल्या जाणाऱ्या ‘थेरीगाथा’ पाली भाषेत शब्दबद्ध झाल्या आहेत. गौतम बुद्धांच्या काळात पाली ही सर्वसामान्य जनसमूहाची व्यवहाराची व संवादाची लोकभाषा होती. मराठी भाषेसोबतच पाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यास शनिवारी (ता. ३) दोन वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त...
---
पाली भाषेच्या अध्ययन, अध्यापन आणि संशोधनाला अभिजात दर्जामुळे प्रोत्साहन मिळणे अपेक्षित आहे. पाली भाषेची निर्मिती प्राकृतमधून झाली असून मराठीत अनेक शब्द पाली भाषेतून आलेले आहेत. भाषाविज्ञानाच्या दृष्टीने पाली भाषेला विशेष महत्त्व आहे. शब्दांचा उगम व आधुनिक भाषेतील शब्दांचे मूळ जाणून घेण्यासाठी पाली भाषेचे अध्ययन उपयुक्त आहे. ही भाषा प्राकृत, संस्कृत आणि आधुनिक भारतीय भाषांना जोडणारा दुवा मानली जाते. मराठी आणि पाली भाषेच्या व्याकरणातही साम्य आढळते. चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी बुद्धाचे विचार आणि या भाषेतील साहित्य भारताबाहेरील अनेक देशांत पोहोचवले. उच्च कोटीची नीतिमूल्ये, सोदाहरण विवेचन, मुद्देसूद युक्तिवाद, बुद्धिवादी अन्वेषण, खंडन-मंडन वादविवाद आणि धम्मपद, सुत्तनिपात यांसारख्या गेय सुभाषित मालांमुळे पाली साहित्याकडे जगाचे लक्ष वेधले गेले. पाली साहित्य केवळ धार्मिक रचना नसून मानवी जीवनाचे विविध आयाम प्रतिबिंबित करणारे अस्सल भारतीय वाङ्मय आहे. मराठी, बंगाली व इतर भाषांना राज्यभाषेचे पाठबळ आहे; पाली कोणत्याही विशिष्ट राज्याची भाषा नसल्याने तिच्याकडे सरकारचे पुरेसे लक्ष नाही. अभिजात दर्जा देऊनही उन्नयन, जतन व संवर्धनासाठी ठोस पावले दिसत नाहीत. विद्यापीठांत पाली विभाग असले तरी विकास, संशोधन आणि व्यावहारिक उपयोजनासाठी पोषक वातावरण जाणवत नाही. प्रसारासाठी पुरेसा निधी मिळतो की नाही, याचीही माहिती नाही. देशात व महाराष्ट्रात व्यक्ती व संस्था कार्य करीत आहेत; त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. नाशिकमधील अतुल भोसेकर यांच्यासारखे विद्वान पाली भाषेच्या उत्थानासाठी व जाणीव-जागृतीसाठी कार्य करीत आहेत. विद्यापीठे, शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी तरुण विद्यार्थ्यांना या भाषेकडे वळविण्यासाठी त्यांची मदत घ्यावी. साहित्यनिर्मितीच्या कार्यशाळा आयोजित करून व्यावसायिक करिअरसाठी भाषेची उपयुक्तता वाढवावी. अशा प्रयत्नांतून पाली भाषेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचेल आणि अध्ययनाची गोडी निर्माण होईल. या भाषेवर प्रेम व आदर करणाऱ्या अभिजात भाषाप्रेमींनी तिची उपेक्षा दूर करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला पाहिजे.
- - प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार
(लेखक सामाजिक विषयांचे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.