एन्कर
फोटो : H34844
पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेसला ‘नॉन-सुपरफास्ट’ दर्जा द्या
मनसे आक्रमक; नाशिक रोड रेल्वेस्थानकप्रमुखांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक/ नाशिक रोड, ता. ९ : पंचवटी व राज्यराणी एक्स्प्रेसला तातडीने नॉन- सुपरफास्टचा दर्जा देण्यात यावा. तसेच महाराष्ट्रातील लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना सवलत द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षातर्फे यासंदर्भात नाशिक रोड रेल्वेस्थानकाचे प्रमुख मनोज कुमार श्रीवास्तव यांना जाब विचारला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन दिले.
मनसेने दिलेल्या निवेदनात मध्य रेल्वेने १ जानेवारी २०२७ पासून ९ लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचा सुपरफास्टचा दर्जा रद्द करून त्यांना नॉन-सुपरफास्ट (मेल/एक्सप्रेस) श्रेणीत वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे विभागाचा हा निर्णय म्हणजे स्थानिक मराठी माणसांना डावलत परप्रांतीयांचे चोचले पुरवण्याचा प्रकार आहे. मराठी माणसांवर हा उघड अन्याय असल्याचा आरोप पक्षातर्फे करण्यात आला. या वेळी लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसोबत पंचवटी व राज्यराणी एक्स्प्रेस या दोन्ही गाड्यांचा तात्काळ नॉन-सुपरफास्ट श्रेणीत समावेश करावा. तसेच तिकीट व मासिक पासच्या दरांमध्ये कपात करून ते सामान्य दरावर आणवे. अनधिकृत सुपरफास्ट सरचार्ज त्वरित रद्द करावा. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात प्रशासनाने या गर्दीच्या मोसमात गाड्यांचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळत गाड्या वेळेवर चालवाव्यात आदी मागण्या करण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
या वेळी मनसेचे शहर उपाध्यक्ष ॲड. नितीन पंडित, विभाग अध्यक्ष गोकुळ नागरे, उपजिल्हा अध्यक्ष संतोष सहाणे, संजय हंडोरे , नितीन धानापुणे, उमेश भोई, भानुमती अहिरे, मीरा आवारे , वैशाली शिंदे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.