तिकिट नाशिकपर्यंतचे उतरवले पिंपळनेरला
पुढील प्रवासाचा मेमो न देता वाहक गायब; दुसऱ्या बसनेही प्रवेश नाकारला
सकाळ वृत्तसेवा
साक्री, ता. ७ : साक्री आगारातून नाशिककडे जाणाऱ्या एसटी बसने प्रवास करणाऱ्या तीन प्रवाशांना गाडीत पुरेसे प्रवासी नसल्याचे क्षुल्लक कारण देत पिंपळनेर बसस्थानकावर अचानक उतरवून देण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. ७) दुपारी घडली. विशेष म्हणजे, प्रवाशांकडून नाशिकपर्यंतचे पूर्ण भाडे घेऊन तिकीट दिल्यानंतरही त्यांना पुढील प्रवासाची कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता तसेच लेखी मेमो न देता वाहकाने बससह तेथून पळ काढल्याने एसटी महामंडळाच्या मनमानी कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
साक्री आगारातून दुपारी १२.४५ ला सुटणाऱ्या नाशिक बसने जी. टी. मोहिते व त्यांच्या परिवारातील ज्येष्ठ नातेवाईक प्रवास करत होते. पिंपळनेर बसस्थानकावर पोहोचल्यानंतर साक्री आगाराचे वाहक राठोड यांनी गाडीत पुरेसे प्रवासी नसल्याचे कारण सांगत नाशिकला जाणाऱ्या या तिन्ही प्रवाशांना जबरदस्तीने खाली उतरविले. त्यानंतर प्रवाशांची कोणतीही पर्यायी सोय न करता ती बस थेट धुळ्याच्या दिशेने परत फिरवण्यात आली. विशेष म्हणजे प्रवाशांना खाली उतरविताना वाहकाने त्यांना पुढील प्रवासासाठी कोणताही लेखी मेमो, तिकिटावर शेरा किंवा अधिकृत नोंद केली नाही.
दरम्यान, पिंपळनेर बसस्थानकावर उभ्या असलेल्या दुसऱ्या एका बसमधून नाशिकला जाण्याचा प्रयत्न प्रवाशांनी केला; मात्र त्या बसच्या चालकानेही प्रवाशांचे म्हणणे ऐकून न घेता बस रिकामीच नाशिकच्या दिशेने नेली. यानंतर नंदुरबारकडून नाशिककडे जाणारी दुसरी बस पिंपळनेर बसस्थानकावर आली असता, श्री. मोहिते व त्यांच्या नातेवाइकांनी संबंधित वाहकाला नाशिकपर्यंत घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र, आधीच्या वाहकाने तिकिटावर कोणताही अधिकृत शेरा दिलेला नसल्याने त्यांना पुढील प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. याप्रकरणी मोहिते यांनी साक्री आगार व्यवस्थापक राजेंद्र अहिरे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून तक्रार केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.