फोटो : H35238
लोगो : राज्य नाट्य स्पर्धा
‘पिवळी भिंत’मधून उलगडला अभिनेत्रीच्या मनाचा कोंडमारा!
एकटेपणा, मानसिक अस्वस्थता आणि वास्तव-कल्पनेतील संघर्षाचे प्रभावी चित्रण
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१७ : कलाकाराचे आयुष्य रंगमंचावर रंगतदार दिसत असले, तरी पडद्यामागील वैयक्तिक आयुष्यात अनेक भावनिक संघर्ष दडलेले असतात. एकटेपणा, मानसिक अस्वस्थता आणि वास्तव-कल्पनेतील द्वंद्व अशा गुंतागुंतीच्या भावविश्वाचा वेध ‘पिवळी भिंत’ या नाटकातून घेण्यात आला. अभिनेत्रीच्या आयुष्यातील मानसिक संघर्षाचे संवेदनशील आणि प्रभावी चित्रण करणाऱ्या या नाटकाचे सादरीकरण मंगळवारी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू असलेल्या राज्य नाट्य स्पर्धेत झाले.
राहुल मनोहर चौधरी लिखित आणि दिग्दर्शित या नाटकातून देवी नावाच्या अभिनेत्रीचा जीवनप्रवास उलगडतो. मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत असलेल्या देवीच्या आयुष्यात मुलीच्या जन्मानंतर अनेक बदल घडतात. मुलीच्या संगोपनासाठी ती काही काळ अभिनय क्षेत्रापासून दूर राहते. या काळात तिच्या मनात एकटेपणाची भावना घर करू लागते. हळूहळू तीव्र होणाऱ्या या भावनेचा परिणाम तिच्या मानसिक स्वास्थ्यावर होतो. तिच्या वर्तनात स्किझोफ्रेनियासदृश लक्षणे दिसू लागतात. पत्नीला या मानसिक अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी तिचा पती सिद्धार्थ, जो पेशाने डॉक्टर आहे, प्रयत्नशील असतो. या दोघांच्या नात्यातील भावनिक गुंतागुंत नाटकातून उलगडत जाते.
मानसिक अस्वस्थतेच्या प्रभावातून देवी रंगमंचावर विविध पात्रांच्या भूमिका साकारू लागते. वास्तव आणि कल्पनेच्या सीमारेषेवर सुरू असलेला तिचा संघर्ष, तिचे भावविश्व आणि पुन्हा सामान्य आयुष्याकडे परतण्याची धडपड यामुळे नाटकाला वेगळी नाट्यमय उंची प्राप्त होते. लेखन आणि दिग्दर्शनातील विविध नाट्यप्रकारांचा कल्पक वापर कथानक अधिक प्रभावी करतो. मानसिक आरोग्याचा प्रश्न केवळ चर्चेपुरता मर्यादित न ठेवता, त्याकडे संवेदनशीलतेने पाहून योग्य कृती करण्याचा संदेशही नाटकातून दिला जातो.
समर, शुभम दाणी, ऋतुजा चंद्रात्रे आणि तन्मई चव्हाणके यांनी विविध भूमिका साकारल्या. विनोद राठोड यांची प्रकाशयोजना आणि स्पर्श बागुल यांचे पार्श्वसंगीत नाटकाच्या आशयाला पूरक ठरले. विद्या सेवा संस्था, नाशिक यांची निर्मिती असलेल्या या नाटकातून एका अभिनेत्रीच्या मानसिक संघर्षाचे बहुआयामी दर्शन घडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.