टुडे एक : सेकंड मेन
---
रेल्वेत नोकरीचे आमिष; तरुणाला ३४ लाखांचा गंडा
नियुक्तिपत्र अन् प्रशिक्षणाच्या नावाखाली फसवणूक; सहा जणांविरुद्ध गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव,ता.३० : रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत नंदगाव येथील विकी युवराज कोळी (वय २६) या तरुणाची ३४ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. सप्टेंबर २०२४ पासून सुरू असलेल्या या प्रकारात तरुणाला नियुक्तिपत्र व प्रशिक्षणाचे पत्र, गणवेश आणि ‘नेमप्लेट’ देण्यात आली. तसेच नांदेड आणि बिहार येथे प्रशिक्षण व कामासाठी पाठविण्यात आले. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकी कोळी हे महावितरण कंपनीत मक्तेदारीवर ऑपरेटर म्हणून काम करतात. त्यांच्या सासऱ्यांसोबत महावितरणमध्ये नोकरी करणाऱ्या एका परिचिताने आपल्या ओळखीतील व्यक्ती पैसे घेऊन नोकरी लावून देत असल्याचे सांगितले. त्यानंतर १९ सप्टेंबर २०२४ रोजी संजय देवरे, सुरेश पवार, बिना पवार आणि त्यांचा मुलगा अमित पवार (सर्व रा. मायादेवी नगर) हे विकी यांच्या सासऱ्यांच्या जुन्या आसोदा रोडवरील घरी आले. त्यांनी इतर तरुणांना नोकरी मिळाल्याचे दर्शविणारी कागदपत्रे दाखविली. त्यामुळे विकी यांचा त्यांच्यावर विश्वास बसला.
नियुक्तिपत्र देऊन उकळले पैसे
रेल्वेत नोकरी मिळेल, या अपेक्षेने विकी यांनी सुरुवातीला तीन लाख रुपये दिले. त्यानंतर २ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांना नियुक्तीसंदर्भात ई-मेल आला. काही दिवसांनी संबंधित व्यक्तींनी पुन्हा भेट घेऊन नियुक्तीसह प्रशिक्षणाचे पत्र दाखविले. त्यावेळी आणखी तीन लाख ६० हजार रुपये घेतले. पुढे रवींद्र रघुनाथ ठाकरे (रा. अमळनेर) यांची भेट घेण्यास सांगण्यात आले. त्यानुसार विकी यांना नांदेड येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. तेथे रोहितकुमार नावाच्या व्यक्तीने त्यांना दोन महिने काम करण्यास सांगितले. त्यानंतर विकी यांना बिहार येथेही कामासाठी पाठविण्यात आले. दरम्यान, त्यांच्या घरी गणवेश, नेमप्लेट आणि काही कागदपत्रे देण्यात आली. संबंधितांनी दिलेल्या गणवेशात विकी बिहार येथे काम करू लागले; मात्र तेथे त्यांना काम करण्यास नकार दिला जाऊ लागला.
चौकट
उडवाउडवीची उत्तरे
नोकरीच्या नावाखाली पैसे देऊनही प्रत्यक्षात काम करता येत नसल्याने विकी जळगावात परतले. त्यांनी संबंधित व्यक्तींकडे याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विकी यांनी २९ ऑक्टोबरला शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी संशयित सुरेश पवार, बिना पवार, अमित पवार (सर्व रा. मायादेवी नगर), रवींद्र रघुनाथ ठाकरे (रा. अमळनेर), रोहितकुमार आणि पूजा हिरामण म्हात्रे अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शनिपेठ पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.