फोटो : H33409
कावनईसह परिसरातील तीर्थक्षेत्रांचा विकास करा
वारकरी संप्रदायाला सन्मान देण्याची कल्कीराम महाराजांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात कावनई, कपिलधारा, कुसेगाव आणि टाकेद तीर्थ या धार्मिक व ऐतिहासिक महत्त्वाच्या स्थळांचा समावेश करून त्यांच्या विकासाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी आदिनाथ संप्रदायाचे पीठाधीश्वर कल्कीराम महाराज यांनी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली. या तीर्थक्षेत्रांना आयुक्तांनी अद्याप प्रत्यक्ष भेट दिलेली नाही, याकडे लक्ष वेधत त्यांनी संबंधित स्थळांची पाहणी करून विकासासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली.
कावनई हे कुंभमेळ्याचे मूळ स्थान असल्याचे नमूद करत या परिसरातील तीर्थक्षेत्रांकडे प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, असे कल्कीराम महाराज यांनी सांगितले. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पायाभूत सुविधा, भाविकांसाठी सोयीसुविधा आणि धार्मिक-सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाशिक जिल्हा संतपरंपरेची भूमी असून, कुंभमेळ्याच्या नियोजनात वारकरी संप्रदायाला योग्य सन्मान मिळावा. संतविचार, सामाजिक एकात्मता आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या ऐतिहासिक व धार्मिक वारशाचे जतन करून परिसरातील तीर्थस्थळांना व्यापक प्रसिद्धी देण्याची गरज त्यांनी अधोरेखित करीत असतानाच कुंभमेळा हा सर्व समाजघटकांसाठी व्यापक धार्मिक व सांस्कृतिक सोहळा असल्याने त्यातून बंधुभाव आणि सर्वसमावेशकतेचा संदेश दिला जावा. प्रमुख शहरांतील व्यवस्थांबरोबरच परिसरातील तीर्थक्षेत्रांच्या विकासाचाही नियोजनात समावेश करावा, असे आवाहन कल्कीराम महाराज यांनी केले.