हफ्ता वसुलीसाठी
रिक्षाचालकावर हल्ला
बाप-लेकांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २५ : मालेगाव स्टॅन्ड परिसरात रिक्षाचालकांकडे दररोज आणि ट्रिपमागे हफ्ता मागणाऱ्या तसेच हफ्ता न दिल्याने रिक्षाचालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात राम वाघमारे, उदय राम वाघमारे आणि शिवा राम वाघमारे या तिघा पितापुत्रांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.
विनायक हिरामण बोरसे (४१, रा. वजेरश्वरी झोपडपट्टी, पंचवटी) या रिक्षाचालकाच्या फिर्यादीनुसार, ते आठ वर्षांपासून कपालेश्वर मंदिर परिसरात रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. संशयित राम वाघमारे व त्याचे सहकारी या परिसरात रिक्षा लावण्यासाठी बळजबरी व दादागिरी करतात. मागील दोन- तीन महिन्यांपासून वाघमारे हा या परिसरातील रिक्षाचालकांकडे दररोज २०० रुपये आणि प्रत्येक ट्रिपमागे २०० रुपयांची खंडणी मागत होता. बोरसे यांनी हफ्ता देणार नाही, असे स्पष्ट सांगितल्यामुळे त्यांच्यावर राग धरून होता. दरम्यान,शुक्रवारी (ता. २३) रात्री बोरसे हे मालेगाव स्टँडजवळ पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. तिथे त्यांचे मित्र नीलेश तराळ व राहुल पवार यांच्याशी बोलत उभे असताना संशयित राम वाघमारे तिथे आला. त्याने धमकी देत दोन मुलांना फोन करून बोलावून घेतले. काही वेळातच दोन्ही मुले उदय वाघमारे आणि शिवा वाघमारे यांनी बोरसेंना बेदम मारहाण केली. उदय वाघमारे याने सिमेंटचा ब्लॉक उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. भांडण सोडवण्यासाठी आलेले मित्र नीलेश तराळ यांनाही संशयितांनी मारहाण केली. घटनास्थळी पोलिस पोचत असल्याचे पाहून संशयित पसार झाले. पुढील तपास उपनिरीक्षक सचिन चव्हाण करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.