टूडे आतील पान
-------------
तपोवनातील झाडे न तोडता साधूग्राम उभारणार
महापालिकेचा निर्णय; वादामुळे कामांना वर्षभरापासून ब्रेक
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात प्रस्तावित असलेल्या साधूग्राममधील १८२५ वृक्षतोडीचा वाद सध्या उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित लवादात अडकला आहे. या वादामुळे साधूग्रामच्या कामांना गेल्या वर्षभरापासून ब्रेक लागला आहे. मात्र, सिंहस्थ अवघ्या ११ महिन्यांवर येऊन ठेपल्याने महापालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून आणि आहे त्या झाडांची स्थिती जैसे थे ठेवून साधूग्रामचे काम सुरू करण्याचा निर्णय आयुक्त मनिषा खत्री यांनी घेतला आहे. न्यायालयाने परवानगी दिली तरच वृक्षतोड होईल, अन्यथा आहे त्या स्थितीतच साधूग्राम उभारला जाईल, अशी प्रशासनाची भूमिका आहे. साधूग्रामसाठी १९१ एकर जागेवर नियोजन आहे. त्यासाठी वर्षभरापूर्वी महापालिकेच्या उद्यान विभागाने तपोवनातील १८२५ झाडांवर पिवळ्या रंगाच्या फुल्या मारून वृक्षतोडीचे रेखांकन केले होते. याची माहिती समोर येताच वृक्षप्रेमींमध्ये संताप उसळला. त्यातच त्याच परिसरात भारत मंडपम (माईस हब) प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध झाल्याने संतापाची लाट राज्यभर पसरली. अभिनेते, पर्यावरणवादी आणि भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांनी या वृक्षतोडीला विरोध केला. तर दुसरीकडे विकासासाठी वृक्षतोड करावीच लागणार, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी मांडली होती. अखेर पर्यावरणप्रेमींनी या विरोधात राष्ट्रीय हरित लवाद आणि उच्च न्यायालयात धाव घेतली. सध्या दोन्ही ठिकाणी वृक्षतोडीला स्थगिती आहे.
----------------चौकट
९ डिसेंबरला सुनावणी
३१ ऑक्टोबरला सिंहस्थाचा ध्वजारोहण सोहळा होणार असून, २ ऑगस्टला पहिले पर्वणी स्नान आहे. त्यामुळे साधूग्राममध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रशासनाकडे अत्यंत कमी वेळ शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने दुहेरी रणनीती आखली आहे. एकीकडे १९१ एकर जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू ठेवली आहे, तर दुसरीकडे ताब्यात असलेल्या जागेत कोणतीही झाडे न तोडता साधूग्राम उभारणीच्या निविदा काढण्याची तयारी सुरू केली आहे. या वृक्षतोडीप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादात ९ डिसेंबरला महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------कोट----------
न्यायालय जो निर्णय देईल, तो प्रशासनाला मान्य असेल. साधूग्राममधील वृक्षतोडी संदर्भातील याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. सिंहस्थ जवळ आल्याने साधूग्राममध्ये पायाभूत सुविधांच्या उभारणीला कमी वेळ राहिला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून आहे त्याच स्थितीत साधूग्रामची कामे सुरू केली जाणार आहेत. न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल.
- मनिषा खत्री, आयुक्त, महापालिका.
----------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.