लोगो : संत मुक्ताबाई जयंती विशेष
---
फोटो : H31853
मुक्ताईच्या अध्यात्माची नाळ ब्रह्मगिरीशी!
गहिनीनाथांचा अनुग्रह, निवृत्तिनाथांचे गुरुत्व; त्र्यंबकेश्वराशी संत मुक्ताबाईंचे नाते
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १० : संत मुक्ताबाईंच्या आध्यात्मिक जडणघडणीतील महत्त्वाचा धागा नाशिकच्या त्र्यंबकेश्वरातील ब्रह्मगिरी पर्वताशी जोडला जातो. संतचरित्र परंपरेनुसार, याच परिसरात निवृत्तिनाथांना गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला. पुढे निवृत्तिनाथांनी ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांच्या आध्यात्मिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर हे मुक्ताबाईंचे स्मृतिक्षेत्र असले, तरी त्यांच्या गुरुपरंपरेचा महत्त्वाचा दुवा त्र्यंबकेश्वरशी जोडला गेला आहे.
विठ्ठलपंत, रुक्मिणीबाई आणि त्यांची चारही मुले ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी त्र्यंबकेश्वर येथे आली होती, अशी आख्यायिका आहे. प्रदक्षिणेदरम्यान वाघामुळे कुटुंबाची ताटातूट झाली आणि निवृत्तिनाथ एका गुहेत गेले. तेथे नाथपंथीय सिद्धयोगी गहिनीनाथांचा त्यांना अनुग्रह लाभल्याचे संतचरित्रांत सांगितले जाते. या गुरुपरंपरेतून निवृत्तिनाथांनी आपल्या भावंडांना अध्यात्म मार्गाची दिशा दिली.
ज्ञानेश्वर आणि सोपानदेव यांच्या समाधीनंतर मुक्ताबाईंचेही जीवनकार्य संपुष्टात आले, अशी संतपरंपरेतील मान्यता आहे. त्यानंतर निवृत्तिनाथांनी त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली. त्यामुळे मुक्ताबाईंच्या बालपणीच्या आध्यात्मिक संस्कारांपासून ते त्यांच्या गुरूंच्या समाधीपर्यंत त्र्यंबकेश्वरचा संदर्भ महत्त्वाचा ठरतो.
चौकट
नाशिकच्या भूमीत गुरुपरंपरेचा दुवा
संत मुक्ताबाईंच्या आध्यात्मिक जडणघडणीत निवृत्तिनाथ आणि गहिनीनाथ यांच्या गुरुपरंपरेला महत्त्वाचे स्थान आहे. ब्रह्मगिरी परिसराशी जोडली गेलेली ही परंपरा नाथ आणि वारकरी संप्रदायांमधील आध्यात्मिक अनुबंध अधोरेखित करते.
कोट
मुक्ताबाईंच्या संदर्भात त्र्यंबकेश्वरकडे केवळ त्यांच्या बालपणीच्या आठवणींचे स्थळ म्हणून नव्हे, तर महाराष्ट्रातील नाथ आणि वारकरी परंपरेतील महत्त्वाची आध्यात्मिक संक्रमणभूमी म्हणून पाहता येते. मुक्ताईनगर हे मुक्ताबाईंचे प्रमुख स्मृतिक्षेत्र असले, तरी त्यांच्या अध्यात्माच्या मुळाशी असलेल्या गुरुपरंपरेचा एक महत्त्वाचा दुवा नाशिकच्या ब्रह्मगिरीशी जोडला गेला आहे.
- प्रा. माधव खालकर, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.