धुळे टुडे २ साठी...
---
फोटो- NSK26H34395, NSK26H34396
धुळे : सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मंगळवारी मनपात आयोजित आढावा बैठकीला उपस्थित राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य रवी कलोसे. शेजारी नितीन कापडणीस, करुणा डहाळे. दुसऱ्या छायाचित्रात उपस्थित विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी, सफाई कर्मचारी.
---
सफाई कर्मचाऱ्यांना सुट्या द्या, वारसाहक्काच्या जागा भरा
---
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग सदस्य रवी कलोसे; चारदा हजेरीबाबत फेरविचार करा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ४ : सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावा, त्यांना सर्व शासकीय सुट्या द्या, दिवसातून चारदा हजेरीच्या विषयावर फेरविचार करा, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी समन्वय समिती गठीत करा, लाड- पागे समितीच्या आधारावर वारसाहक्काच्या जागा आपल्या स्तरावर व अधिकारात भरा आदी विविध निर्देश भारत सरकारच्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य रवी कलोसे यांनी महापालिकेसह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य श्री. कलोसे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता.३) महापालिकेतील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात आढावा बैठक झाली. मनपा आयुक्त नितीन कापडणीस, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे यांच्यासह महापालिका व विविध विभागांचे अधिकारी, सफाई कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी नागेज कंडारे, विजय पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध विषयांवर श्री. कलोसे यांनी आढावा घेतला. यात महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी समन्वय समितीच्या मुद्द्यावर अशी समिती गठीत असून त्याची बैठकही झाल्याचे उपायुक्त हेमंत निकम यांनी सांगितले. मात्र, अशी समितीच नसल्याचे कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले. त्यावर श्री. कलोसे यांनी संघटना नोंदणीकृत असो की अनोंदणीकृत त्यांना सोबत घेत समिती गठीत करा अशी सूचना केली. सफाई कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत कार्ड वाटप करा, त्यासाठी मनपात शिबिर घ्या अशी सूचनाही त्यांनी केली. कंत्राटी कामगारांच्या विषयावर १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देशही श्री. कलोसे यांनी दिले. लाड-पागे समितीनुसार वारसाहक्काच्या जागा आपल्या अधिकारात भरा, पंधरा दिवसात याबाबत कार्यवाहीचे निर्देशही त्यांनी संबंधित सर्व विभागांना दिले.
वाल्मिकी भवन व्हावे
शहरात वाल्मिकी भवन साकारण्याच्या अनुषंगाने विषय प्रस्तावित करा अशी सूचनाही श्री. कलोसे यांनी दिली. तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रश्न, ग्रॅच्युईटीचा प्रश्न, व्यापारी संकुलात गाळ्याचे आरक्षण, सेवापुस्तक अद्ययावत ठेवणे आदी विविध विषयांवर कार्यवाहीच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार पदोन्नतीच्या विषयावर मनपा प्रशासनाकडून झालेल्या कार्यवाहीचे श्री. कलोसे यांनी कौतुक केले.
हजेरीबाबत फेरविचार करा
सफाई कर्मचाऱ्यांची दिवसातून चार वेळा हजेरी घेतली जाते, ती अन्यायकारक असल्याचा मुद्दा कर्मचाऱ्यांनी मांडला. त्यावर बायोमॅट्रीक पद्धतीला विरोध नाही पण दिवसातून चारवेळी हजेरीचा प्रशासनाने फेरविचार करुन निर्णय घ्यावा अशी सूचना श्री. कलोसे यांनी केली. तसेच, सफाई कर्मचाऱ्यांना सर्व शासकीय सुट्या द्या, कामाची अपरिहार्यता असेल तर सुटीच्या दिवसाचा त्यांना मोबदला द्या, असेही त्यांनी प्रशासनाला सांगितले.
---
...चौकट...
माणसासारखे वागा
वारसाहक्काने नोकरीच्या मुद्द्यावर श्री. कलोसे यांनी शासनाच्या विरोधात काम करु नका, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग हा मानवाधिकार आयोगासोबत काम करणार असल्याने तेथे तक्रार करेन असा इशारा देत माणसासारखे वागा असे आवाहनही श्री. कलोसे यांनी संबंधित अधिकाऱ्याला उद्देशून केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.