सारुळमधील क्रशर चालकांना तहसीलदारांचा दणका
नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘प्रदूषण नियंत्रण’ ला कारवाईचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१८ : बहुचर्चित सारूळ येथील क्रशरबंदी कारवाईला आता नवे वळण मिळाले आहे. पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाल्याचे सुनावणीदरम्यान स्पष्ट झाल्याने संबंधित क्रशरचालकांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार पंकज पवार यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. तसेच गौणखनिजाचा साठा आणि विक्री करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची आवश्यक परवानगी घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे क्रशरचालकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
नाशिक तालुक्यातील सारूळ व परिसरातील ४९ क्रशरचालकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे तसेच निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक उत्खनन केल्याचे महसूल प्रशासनाच्या कारवाईत उघड झाले होते. त्यानंतर प्रशासनाने संबंधित क्रशर सील करून परिसरातील वीजपुरवठाही खंडित केला होता. या कारवाईविरोधात सात क्रशरचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने सुनावणीदरम्यान तहसीलदारांना संबंधितांची बाजू ऐकून घेऊन नियमानुसार निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार तहसीलदार पवार यांनी सातही क्रशरचालकांना सुनावणीसाठी बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित विभागाने योग्य ती कारवाई करून अहवाल सादर करावा, असे आदेश देण्यात आले. याशिवाय गौणखनिजाच्या साठवणूक व विक्रीसाठी जिल्हा प्रशासनाची रीतसर परवानगी घेणे आवश्यक असून, त्यासाठी संबंधित दगड किंवा गौणखनिजाचा अधिकृत स्रोत सिद्ध करावा लागणार आहे.
परवानगीशिवाय साठा, विक्रीला मनाई
महाराष्ट्र गौणखनिज उत्खनन नियम २०१३ नुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून आवश्यक व्यापारी परवानगी घेण्याचे निर्देश क्रशरचालकांना देण्यात आले आहेत. ही परवानगी नसताना गौणखनिजाचा साठा करणे, विक्री करणे किंवा वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. आदेशांचे उल्लंघन केल्यास थेट कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाईनंतरही क्रशरचालकांसमोरील कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणी कायम असल्याचे चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.