शिलाई मशिन वाटपाच्या नावाखाली ९० महिलांना गंडा
---
साडेतीन लाखांची फसवणूक; बंटी-बबलीविरुद्ध गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : शासकीय याेजनेचा बनाव करून ३५ टक्के रक्कम भरून शिलाई मशिन देण्याचे आमिष दाखवून ९० महिलांची तीन लाख १० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार सप्टेंबर २०२५ पासून सुरू होता. या प्रकरणी सपना संजय कोळी व संजय कोळी-सोनवणे (दोघे रा. देवकरनगर, खोटेनगरजवळ, जळगाव) या दोघांविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
भादली गावामध्ये ३५ टक्के रक्कम भरून फुल शटल मोटारसहित शिलाई मशिन मिळेल, असे पॉम्पलेट लावले होते. त्यानंतर त्याची माहिती देण्यासाठी सप्टेंबर २०२५ मध्ये सपना कोळी व संजय कोळी भादली गावात गेले व योजनेची माहिती दिली. गावातील माधुरी भागवत मिस्तरी (वय ५०) यांना शिलाई मशिन मिळाली असल्याने दोघांनी त्यांना भेटून ‘तुम्हाला ज्या पद्धतीने मशिन मिळाली, त्याप्रमाणे तुमच्या ओळखीतील महिलांकडून पैसे व अर्ज जमा करून द्या, पैसे मिळाल्यानंतर इतर महिलांनाही मशिन देऊ’, असे सांगितले. त्यानुसार माधुरी मिस्तरी यांनी ओळखीतील व नात्यातील एकूण ९० महिलांना माहिती दिली. त्यानंतर सपना कोळी व संजय कोळी यांना ऑनलाइन व रोख स्वरूपात एकूण तीन लाख दहा हजार रुपये दिले. पैसे जमा झाल्यानंतर साडेतीन महिन्यांत मशिन देण्याचे सांगितले होते. मात्र, मुदत संपूनही मशिन मिळाल्या नाहीत. त्यामुळे माधुरी मिस्तरी यांनी कोळी यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. वारंवार पाठपुरावा केल्याने दोघांनी शिवीगाळ करत धमकी दिली. मशिन तर मिळाल्याच नाहीत, पैसेही परत मिळत नसल्याने माधुरी मिस्तरी यांनी रविवारी (ता. १५) दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात सपना कोळी व संजय कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.