लोगो : शालार्थ आयडी घोटाळा
तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यासह दोघांना अटक
नाशिक रोड पोलिसांकडून कारवाई; सोमवारपर्यंत पोलिस कोठडी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२३ : शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी अमोल कुलकर्णी आणि तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना शुक्रवारी (ता.२३) अटक केली. दोघांना न्यायालयात हजर केले असता, सोमवार (ता.२६) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
कुलकर्णी हा मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील एम. एफ. तराळ विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिस त्याच्या शोधात होते. अखेर शुक्रवारी त्याला या प्रकरणात अटक करण्यात आली.
हिंगोणेकर यांना यापूर्वी अन्य प्रकरणात अटक झाली होती. नाशिक रोड पोलिस ठाण्यातील गुन्ह्याच्या तपासासाठी न्यायालयाच्या हस्तांतरण वॉरंटद्वारे त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर त्यांनाही या गुन्ह्यात अटक करण्यात आली.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या मागील तारखांपासून दाखवून मान्यता मिळविणे, बनावट कागदपत्रांचा वापर करणे आणि त्याआधारे शासनाकडून वेतन उचलणे, असे आरोप या घोटाळ्यात आहेत. नियुक्त्यांना मान्यता देताना वापरण्यात आलेली कागदपत्रे, त्यांची पडताळणी आणि या प्रकरणातील अन्य सहभागींचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) तपास सुरू आहे.
बनावट कागदपत्रे, कथित आर्थिक व्यवहार आणि अन्य संशयित आरोपींबाबत माहिती मिळविण्यासाठी दोघांची कोठडी आवश्यक असल्याचे तपासी अधिकारी आणि सरकारी अभियोक्त्यांनी न्यायालयात सांगितले. त्यानुसार न्यायालयाने दोघांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या चौकशीत घोटाळ्यातील कथित आर्थिक व्यवहार आणि मान्यता प्रक्रियेतील अनियमिततांबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.