NSK26H31654
जळगाव : तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या शानभाग विद्यालयाच्या मुलींच्या संघासमवेत मान्यवर.
–––
‘शानभाग’ मुलींच्या संघाला
कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ७ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत शानभाग विद्यालयाच्या मुलींच्या संघाने विजेतेपद पटकाविले.
आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयात सदर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आज (ता.७) पार पडल्या. या स्पर्धेत विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालयाच्या १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. या कामगिरीमुळे संघाची आगामी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दरम्यान, १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघानेही दमदार कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली. मात्र शानभाग विद्यालयाच्या संघाला अवघ्या तीन गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. स्पर्धेसाठी खेळाडूंना विद्यालयातील क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. मुलींच्या संघाच्या विजेतेपदाबद्दल तसेच मुलांच्या संघाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शालेय व्यवस्थापन मंडळ विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, विभाग प्रमुख रुपाली पाटील, स्वप्नील पाटील, क्रीडा शिक्षक आणि शालेय परिवारातील सदस्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.