युरोपियन मेंबर्स कौन्सिलच्या
निवडणुकीत श्रीकांत पाटील उमेदवार
नाशिकच्या शिरपेचात जागतिक स्तरावर मानाचा तुरा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १८ : नाशिकच्या कर्तृत्वाचा सुगंध आता सातासमुद्रापार दरवळू लागला आहे. यापैकीच एक असलेल्या ग्लोबल स्टार्टअप मेंटॉर, चार्टर्ड इंजिनिअर आणि पॅरेंट नाशिकचे संस्थापक श्रीकांत पाटील यांनी आंतरराष्ट्रीय पटलावर आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. युरोपमधील प्रतिष्ठित ‘युरोपियन मेंबर्स कौन्सिल’च्या निवडणुकीसाठी त्यांची अधिकृत उमेदवार म्हणून निवड झाली आहे.
पाटील यांच्या निवडीमुळे नाशिकच्या शिरपेचात जागतिक मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. भारतीय प्रतिभेचा लौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे. युरोपियन प्रो ही युरोपच्या सांस्कृतिक वारशाचे डिजिटल स्वरूपात जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर प्रसारण करणारी महत्त्वपूर्ण संस्था आहे. गॅलरी, ग्रंथालये, संग्रहालये आणि डिजिटल क्षेत्रातील तज्ज्ञांना एका समान व्यासपीठावर आणत सांस्कृतिक वारशाच्या डिजिटल परिवर्तनाला गती देण्याचे कार्य ही संस्था करते. अशा महत्त्वपूर्ण संस्थेच्या धोरणात्मक दिशा, निर्णयप्रक्रिया आणि भविष्यातील वाटचालीत भूमिका बजाविणाऱ्या ‘मेम्बर्स कौन्सिल’च्या निवडणुकीसाठी श्रीकांत पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.
श्रीकांत पाटील यांचा गेल्या ३२ वर्षांहून अधिक काळ औद्योगिक विकास, निर्यात, उद्योजकता आणि शाश्वत विकास या क्षेत्रांतील प्रवास उल्लेखनीय आहे. भारत सरकारच्या ‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रमात मेंटॉर, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये मास्टर ट्रेनर म्हणून त्यांनी योगदान दिले आहे. मागील वर्षी वाणिज्य मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय उत्पादकता परिषदेमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्य करताना धोरणनिर्मितीच्या प्रक्रियेतही त्यांनी आपला अनुभव आणि कौशल्याचा ठसा उमटविला.
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत तसेच प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाशी संबंधित ‘आय-स्टेम’ आणि ‘अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन’चे मानद राजदूत म्हणून त्यांची निवड झालेली आहे.
या निवडीबद्दल श्रीकांत पाटील म्हणाले, की डिजिटल क्रांती, मुक्त माहिती, शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. आंतरराष्ट्रीय संस्था, जागतिक व्यापार आणि स्टार्टअप परिसंस्थेतील अनुभवाचा उपयोग करून भारत आणि युरोपदरम्यान भक्कम डिजिटल व सांस्कृतिक सेतू निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे.