दिवाळी अंकासाठी लेख : श्रीक्षेत्र पद्मालय
NSK26H32193 : श्रीक्षेत्र पद्मालय मंदिराचा निसर्गरम्य परिसर व तलावात उमललेली कमळाची फुले.
---
NSK26H32197 : डाव्या-उजव्या सोंडेच्या स्वयंभू श्रीगणेशमूर्ती.
---
NSK26H32195 : मंदिरासमोर असलेली अकरा टन वजनाची पंचधातूची घंटा.
---
NSK26H32199 : ऐतिहासिक भीमकुंड.
----
NSK26H32206 : आल्हाद जोशी (प्रतिनिधी)
---
निसर्गरम्य गणेशपीठ : श्रीक्षेत्र पद्मालय
महाभारतकालीन ‘एकचक्रनगरी’ आणि ऐतिहासिक दरवाजांचे शहर असणाऱ्या एरंडोल तालुक्याला समृद्ध धार्मिक वारसा लाभला आहे. यात प्रामुख्याने श्रीगणेशाच्या साडेतीन पीठांपैकी एक असलेले ''श्रीक्षेत्र पद्मालय'' हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून, येथे हेमाडपंथी मंदिर, डाव्या-उजव्या सोंडेच्या स्वयंभू मूर्ती आणि ११ टनी पंचधातूच्या घंटेचे अद्भुत नादमाधुर्य अनुभवायला मिळते.
- आल्हाद जोशी, एरंडोल
एरंडोलपासून अवघ्या अकरा किलोमीटर अंतरावर असलेले श्रीक्षेत्र पद्मालय हे देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पद्मालय हा शब्द ‘पद्म’ आणि ‘आलय’ या दोन शब्दांचा मिलाफ आहे, जो संस्कृतमध्ये कमळाचे घर आहे. श्री गणेशाच्या साडेतीन पीठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या देवस्थानात उजव्या व डाव्या सोंडेच्या आमोद आणि प्रमोद अशा दोन स्वयंभू गणेशमूर्ती विराजमान आहेत. मंदिराचे बांधकाम दगडी व हेमाडपंथी शैलीतील असून, शिखरावर सोन्याचा कळस आणि गाभाऱ्यात चांदीचे आवरण आहे. मंदिरासमोरील तलावातील रंगीबेरंगी कमळांची फुले परिसराच्या सौंदर्यात भर घालतात. मंदिराच्या चारही बाजूंना घनदाट जंगल असून, पावसाळ्यात मोरांचा वावर पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. मंदिरासमोर सुमारे अकरा टन वजनाची पंचधातूची भव्य घंटा आहे. काशी येथे तयार करण्यात आलेल्या या घंटेचा आवाज दूरवर ऐकू येतो. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील भव्य दगडी जाते हेही येथील वैशिष्ट्य आहे. या जात्याला ‘भीमाचे जाते’ असेही म्हटले जाते. मंदिराच्या प्रवेशद्वारावरच मोठे जाते (जुन्या काळातील चक्की) आहे.
पद्मालय मंदिराचे वैभव
मंदिरात प्रवेश करताच सव्वा मीटर उंचीच्या भव्य दगडी उंदराच्या मूर्तीचे दर्शन होते. पूर्वाभिमुख मंदिरात अंगारकी चतुर्थीला हजारो भाविक दर्शनासाठी येतात. पहिल्या बाजीराव पेशव्यांनी देवस्थानासाठी १८ हजार रुपये उत्पन्नाची गावे दिली होती. ब्रिटीशकाळात देखील देवस्थानासाठी दरवर्षी ६६८ रुपयांची शासकीय मदत दिली जात होती. मंदिराच्या बांधकामासाठी आमडदे येथील खाणीतून सुमारे एक हजार बैलगाड्या दगड ५० किलोमीटर अंतरावरून आणण्यात आले. वाहतुकीसाठी बैल, घोडे, रेडे व गाडीवानांच्या पाण्यासाठी मार्गावर विहिरी खोदल्या होत्या. कासोदा येथील दानशूराने तलावाला आठ पायऱ्यांचा दगडी घाट बांधला. मंदिराचे बांधकाम ५६ कुशल कारागिरांसह दीडशे जणांनी नऊ वर्षांत पूर्ण केले.
भव्य दगडी जाते
मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या भव्य दगडी जात्याला दोन बैल जुंपून धान्याचे पीठ केले जात असे. या जात्यावर तासाला सुमारे दहा किलो धान्य दळून पीठ मोठ्या कोठ्यांमध्ये साठविले जात होते. त्यातून भाविकांसाठी महाप्रसाद तयार केला जात असे. दोन खुंटे असलेल्या या जात्याला ‘भीमाचे जाते’ म्हणूनही ओळखले जाते.
भीमकुंडाची आख्यायिका
मंदिरासमोर तलावापलीकडे २५ फूट उंचीची भव्य दीपमाळ असून, त्यावर १०८ दिवे लावले जात होते. रात्री तलावातील पाण्यात मंदिराचे व दीपमाळेचे प्रतिबिंब दिसत असे. आख्यायिकेनुसार, अज्ञातवासात पांडव पद्मालय मंदिरात पूजेसाठी येत. मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर भीमकुंड आहे. येथे भीम व बकासुर यांच्यात द्वंद्वयुद्ध झाल्याचे सांगितले जाते. बकासुराचा वध केल्यानंतर तहानलेल्या भीमाने खडकावर प्रहार केल्याने कुंड निर्माण झाले, अशी आख्यायिका आहे. सध्या दुर्लक्षामुळे कुंडाची खोली पाच फुटांपर्यंत घटली आहे. परिसरातील महादेव मंदिरही पांडवांच्या वास्तव्याशी जोडले जाते.
निसर्गरम्य परिसर
श्रीक्षेत्र पद्मालय परिसरातील घनदाट जंगल आणि पावसाळ्यातील हिरवाई पर्यटकांना आकर्षित करते. माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार अमोल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सुमारे २३ कोटींचा निधी मंजूर झाला असून विकासकामे अंतिम टप्प्यात आहेत. वन विभागाच्या दहा कोटींच्या निधीतून दहा एकरांवर ‘गणराया उद्यान’ साकारले जात आहे. अडीच एकरांवर औषधी वनस्पतींचे वन उद्यान विकसित होणार असून, लाकडी शिल्पे, वन्यप्राण्यांच्या प्रतिकृती, कारंजे आणि निवासस्थाने पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहेत.
महाभारतकालीन पांडववाडा
शहराच्या मध्यभागी सुमारे ४,५१५ चौरस मीटर क्षेत्रात असलेला पांडववाडा पुरातत्त्व विभागाच्या संरक्षित यादीत आहे. हेमाडपंथी दगडी बांधकाम असलेल्या या वास्तूची देखभाल-दुरुस्तीअभावी दुरवस्था झाली असून, संरक्षक भिंती कोसळण्याच्या स्थितीत आहेत. लाक्षागृहातून पांडव, कुंती व द्रौपदी भुयारी मार्गाने पद्मालय येथे गेल्याची आख्यायिका आहे. पांडववाड्याजवळील प्राचीन पायविहिरीचे अस्तित्वही दुर्लक्षामुळे संपुष्टात येत आहे. पांडववाडा, पद्मालय, भीमकुंड आणि पायविहीर या स्थळांचा ऐतिहासिक व धार्मिक संबंध जोडला जातो.
श्रीक्षेत्र पद्मालयला कसे जावे?
श्रीक्षेत्र पद्मालय जळगावपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर आहे. जवळचे रेल्वेस्थानक जळगाव, धरणगाव येथे आहे. जळगाव, एरंडोल, पारोळा येथून एसटी बस उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.