शिरपूर तालुक्यातील
दुसरा बिबट्याही जेरबंद
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. ५ : तालुक्याच्या पश्चिम भागात दहशत पसरविणाऱ्यांपैकी दुसऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. सोमवारी (ता. ५) पहाटे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात भक्ष्याच्या आमिषाने आलेला बिबट्या अडकला. मात्र, आणखी काही बिबट्यांचा परिसरात संचार असून, ग्रामस्थांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
बोराडी वनक्षेत्रातील वासर्डी परिमंडलात अर्थे बुद्रुक शिवारात ९ सप्टेंबरला रात्री साडेसातला बिबट्याने दोन वर्षांच्या बालकाला जबड्यात धरून नेले होते. या घटनेनंतर बिबट्याला जेरबंद करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले. अर्थे बुद्रुक, भरवाडे, टेंभे, टेकवाडे, खामखेडा, नवे लोंढरे, जुने लोंढरे, वरखळ, विखरण, नवे व जुने भामपूर, जळोद आदी परिसरात बिबट्याचा शोध सुरू होता. २ ऑक्टोबरला पांडुरंग माळी यांच्या शेतात घराजवळ ट्रँक्विलायझर गनद्वारे बिबट्याला डार्ट करून बेशुद्ध करून ताब्यात घेतले.
परिसरात बिबट्यांचा वावर असल्याची शक्यता गृहीत धरून वन विभागाने पिंजरे मात्र कायम ठेवले. त्यात बिबट्यासाठी आमिष म्हणून भक्ष्य ठेवण्यात आले. भरवाडे (ता. शिरपूर) शिवारातील पिंजऱ्यात दुसरा बिबट्या जेरबंद झाला. मुख्य वनसंरक्षक मोहन नाईकवाडी, उपवनसंरक्षक राजेंद्र सदगीर, विभागीय वन अधिकारी राहुल घरटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी किरण गिरवले, विशाल दुराने, सुनील जोग, भूषण वाघ, योगेश वारुळे, शिरपूर उपवन विभागातील वनपाल, वनरक्षक, वनमजूर व वाहनचालकांनी कारवाईत भाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.