सिंहस्थ ध्वजारोहणासाठी २० पर्यंत सूक्ष्म नियोजनाचे निर्देश
सुरक्षा, वाहतूक, वाहनतळांसह पायाभूत सुविधांवर भर; ३१ ला ध्वजारोहणाने प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : सिंहस्थ- कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासह गोदावरी महाआरती व अन्य कार्यक्रमांच्या तयारीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी २० ऑक्टोबरपर्यंत सूक्ष्म नियोजन पूर्ण करावे, असे निर्देश कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिले. सुरक्षा, वाहतूक, वाहनतळ, आरोग्य, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या व्यवस्थांवर विशेष भर देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबरला ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळ्याचा प्रारंभ होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्राधिकरणाच्या कार्यालयात मंगळवारी (ता. १३) बैठक झाली. यावेळी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ध्वजारोहणासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने सुरक्षा व्यवस्था काटेकोर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. बंदोबस्त, गर्दी व्यवस्थापन, बॅरिकेडिंग, वाहनांची ये-जा, वाहनतळ आणि वाहतूक नियंत्रणासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. व्हीव्हीआयपी मार्ग, ध्वजस्तंभ, रामतीर्थ, कुशावर्त तीर्थ, मंदिर परिसर आणि नवीन नदीघाट परिसरातील व्यवस्थाही वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
विविध कार्यक्रमांचे नियोजन
सिंहस्थाच्या प्रारंभानिमित्त १७ ऑक्टोबरला त्र्यंबकेश्वर येथे ग्रामसभा, २० ऑक्टोबरला ‘हर घर कुंभध्वज’ उपक्रम, २५ ऑक्टोबरला शंखनाद, तर ३० ऑक्टोबरला ग्रामपरिक्रमा व संयुक्त पाहणी नियोजित आहे. कार्यक्रमस्थळांची सजावट, विद्युत रोषणाई, पायाभूत सुविधा आणि सायंकाळच्या कार्यक्रमांसाठी नागरिकांची प्रवेशव्यवस्था यांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.