फोटो क्रमांक ः 34085
धुळे ः सर्वोपचार रुग्णालय अधिसेविका कार्यालयाबाहेर निदर्शने करताना गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचे सदस्य.
---
सोलापूर जीएनएम परीक्षेबाबत
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
---
धुळ्यात नर्सेस फेडरेशनतर्फे निदर्शने
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३० ः सोलापूर येथील जीएनएम परीक्षांच्या ‘कॅप’ राऊंडदरम्यान उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याप्रकरणी तक्रारीची गंभीर दखल घेत महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
उत्तरपत्रिका महाविद्यालयाबाहेर नेण्यात आल्या होत्या का? सुरक्षिततेच्या नियमांचे पालन झाले होते का आणि गुणनोंदींमध्ये फेरफार झाला आहे का, याची निष्पक्ष चौकशी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे करण्यात यावी, अशी मागणी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे. परिचर्या शिक्षणाचा थेट संबंध भविष्यातील रुग्णसेवेच्या गुणवत्तेशी असल्याने शासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे, असे फेडरेशनने स्पष्ट केले आहे. सीसीटीव्ही फुटेज, वाहतुकीची माहिती आणि मूळ उत्तरपत्रिकांची पडताळणी करून जबाबदार व्यक्तींची भूमिका निश्चित करण्याची आणि दोषींवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिसेविका कार्यालयाबाहेर महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या स्थानिक पदाधिकारी व सदस्यांनी निदर्शने केली.