सेकंडमेन
CSG26B02996 (चाळीसगाव रेल्वेस्थानक)
----------
चाळीसगाव स्थानकावर विशेष गाड्यांना थांबा
---------------
रेल्वे प्रशासनाचा निर्णय; सणासुदीच्या काळात प्रवाशांना मोठा दिलासा
सकाळ वृत्तसेवा
चाळीसगाव, ता. ४ : आगामी दिवाळी, दुर्गापूजा व छठपूजेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते हटिया या स्थानकांदरम्यान साप्ताहिक उत्सव विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाडीला पाचोरा व चाळीसगाव स्थानकांवर अधिकृत थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नोकरदार, व्यापारी व पूर्व भारतात जाणाऱ्या भाविक-प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाडसह खानदेशात चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, मलकापूर व पुढे अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड, झारसुगुडा व राउरकेला या प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. या गाडीत १ एसी फर्स्ट/सेकंड, २ एसी सेकंड, ७ सामान्य द्वितीयश्रेणी डबे एसी थर्ड, ६ स्लीपर व ४ डबे जोडण्यात आले आहेत. प्रवाशांनी या विशेष सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तिकिटांसाठी ‘रेलवन'' ॲप अथवा अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
असे राहणार वेळापत्रक
गाडी क्रमांक ०८६१० एलटीटी ते हटिया ही १३ ते २७ ऑक्टोबरदरम्यान दर मंगळवारी रात्री १०.५५ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. नाशिक, मनमाडमार्गे येत चाळीसगाव व पाचोरा येथे थांबून ती तिसऱ्या दिवशी पहाटे ४.३०ला हटिया येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०८६०९ हटिया ते एलटीटी परतीच्या प्रवासात १२ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबरदरम्यान दर सोमवारी दुपारी ४.२०ला हटिया येथून सुटेल व पाचोरा, चाळीसगावमार्गे दुसऱ्या दिवशी रात्री ९.५०ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे.
स्थानके देखणी, पण...
अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत चाळीसगाव व पाचोरा रेल्वेस्थानकांचे कोट्यवधी रुपये खर्चून आधुनिकीकरण केले जात आहे. स्थानकांवर लिफ्ट, सरकते जिने, सुशोभीकरण करून प्रवाशांना अत्याधुनिक पायाभूत सुविधा पुरविल्या जात आहेत. मात्र, अनेक लांब पल्ल्याच्या व जल्द गाड्यांना येथे थांबा नसल्याने चाकरमानी, विद्यार्थी व व्यापाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. केवळ त्या स्थानकांचा कायापालट करून उपयोग नाही, तर आवश्यक एक्सप्रेस या गाड्यांना तातडीने थांबा द्यावा, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.