Jadhav Sisters
Jadhav Sisters esakal
नाशिक

Success Story: मंदिराच्या सेवक जाधव भगिनी बनल्या महिलांच्या प्रेरणास्थान

विजयकुमार इंगळे

चारुशीला देवीदास जाधव यांच्या काजल आणि दीपाली या दोन मुली... माहेर सटाणा शहरातील उपासनी गल्ली येथील, तर सासर साक्री तालुक्यातील दिघावे येथील... काजल घरात मोठी, तर लहान बहीण दीपाली यांच्या निमित्ताने चारुशीलाताई यांना मोठा आधार होता. जगण्याची वाट खूपच बिकट होती. कौटुंबिक कलहामुळे गाव सुटलं... आईच्या आणि आजीच्या वाट्याला जणू दारिद्र्य पूजलेलंच होतं... परिणामी, दोघींनाही याच वाटेवर जावं लागलं.

आई आजारपणामुळं सोडून गेल्यानं आजीनं दोघींना वाढवलं... वाट्याला आलं ते धुणी-भांडी, मंदिरात सफाई करण्याचं काम... मात्र आयुष्यात मिळालेला जन्म सार्थकी लावायचा असेल तर स्वतःला सिद्ध करावंच लागेल, या ध्येयाने प्रेरित होऊन थेट मंदिर झाडण्यापासून ते मोलकरीण असलेल्या भगिनींनी परिस्थितीवर मात करत पोलिस सेवेत दाखल होत स्वतःला सिद्ध केलंय ते सटाणा शहरातील काजल आणि दीपाली या जाधव भगिनींनी. (Success Story of Temple servant Jadhav sister join police became inspiration for women nashik news)

काजल आणि दीपाली या भगिनींचं मूळ गाव साक्री तालुक्यातील दिघावे येथील... आई चारुशीला यांच्या वाट्याला जणू दुःख पाचवीलाच पूजलेलं होतं. कौटुंबिक कलहामुळे चारुशीला जाधव यांना गाव सोडून माहेरी परतण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मात्र त्याही परिस्थितीत कुटुंबात जन्माला आलेल्या काजल आणि दीपाली या मुलींसाठी त्यांनी स्वतःला भक्कम केलं.

कष्टाची बिकट वाट

वाट्याला आलेलं आयुष्य पुढे नेताना जाधव परिवारातील आई चारुशीला, तसेच मुलगी काजल व दीपाली यांना आधार होता तो आजी बेबीताई गुंजाळ यांचा... नियतीपुढे कोणाचेही काहीच चालत नाही, या विचारांवर चालत बेबीताई गुंजाळ यांनी नातींकडे लक्ष दिले. कुटुंबासमोर आलेल्या परिस्थितीला सामोरे जाताना नातींना भक्कम आधार देत असतानाच वेळोवेळी त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली.

अशा कठीण काळात काजल सातवीत तर दीपाली पाचवीत असताना दोन्ही भगिनी आई आणि आजीला मदत व्हावी यासाठी धुणी-भांडी करत तुटपुंज्या पगारावर काम करत होत्या. ऐन विद्यार्थिदशेत दोन्ही भगिनींच्या वाट्याला आलेलं आयुष्य कथन करताना काजल आणि दीपाली या दोन्हीही रडल्या.

जन्मदात्रीची साथ सुटली...

रोजच्या कष्टमय आयुष्याला पुढे नेताना दोन्ही भगिनींसमोर येणारा प्रत्येक दिवस नवीन आव्हाने घेऊन येत होता. धुणी-भांडी करण्याच्या कामाबरोबरच दोन पैसे अधिक मिळावेत म्हणून दोन्हीही सटाणा शहरातील बालाजी मंदिरात फरशी पुसण्यासाठी, तसेच साफसफाई करण्यासाठी जात होत्या. परिस्थितीच्या ओझ्याखाली दबलेल्या कुटुंबाचा घटक असलेल्या काजल आणि दीपाली यांनी आई आणि आजींचा विश्वास सार्थ ठरवत शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ न देता अभ्यासाकडे लक्ष दिले.

मुलींनी उच्चशिक्षण घेऊन समाजात स्वतःची ओळख उभी करावी, या उद्देशाने आईने सटाणा शहरातच अश्वमेध अकादमीत क्लासेससाठी प्रवेश घेतला. या ठिकाणीही अकादमीतर्फे दोन्ही भगिनींची परिस्थिती पाहून त्यांना पूर्णपणे सहकार्य केले. मात्र या काळातच आई चारुशीला अंथरुणाला खिळल्या... अकाली आजारपणातून चारुशीलाताई अखेरपर्यंत सावरल्याच नाहीत आणि त्यातून त्यांनी मुलींची साथ सोडली.

आजी बनल्या आधार

मुलीच्या अकाली निधनाने खचून गेलेल्या नातींना आधार देत आजी बेबीबाई गुंजाळ यांनी मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष पुरवत असतानाच त्यांच्यासाठी मायेचा आधार बनल्या. याच काळात त्यांनी पदवीचे शिक्षण घेत असतानाच आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे, असे ध्येय ठेवत पोलिस भरतीची तयारी सुरू केली होती. महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच पोलिस भरतीची तयारी करत असतानाच वाट्याला आलेलं आयुष्य त्या कधीही विसरल्या नाहीत. आजीने दिलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर दोन्ही भगिनींची पोलिस भरतीसाठी निवड झाल्याने मात्र आजीच्या आयुष्याचं सार्थक झाल्याचं समाधान दोघींच्या बोलण्यातून जाणवलं.

नामवंत कुस्तीपटू ते पोलिस

आयुष्याच्या वाटचालीत आलेल्या चढ-उतारांवर न डगमगता उभं राहिलेलं आयुष्य पुढे नेताना आलेल्या प्रसंगांना धीरोदात्तपणे तोंड देताना काजल आणि दीपाली या भगिनींचा प्रवास थक्क करणारा असाच आहे. विद्यापीठ पातळीवर कुस्ती स्पर्धेतही दोन्ही भगिनींनी मिळवेलंल यश नक्कीच अभिमानास्पद असे आहे. काजल आणि दीपाली यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असतानाच विद्यापीठ पातळीवर, तसेच कसमादे परिसरातील विविध यात्रांमध्ये अनेक नामवंत महिला कुस्तीपटूंना लोळवत या खेळात आपली चुणूक दाखवलीय.

आयुष्याची वाट भक्कम करत असताना या वाटचालीत आजी बेबीबाई गुंजाळ, आई चारुशीला, मामा धनंजय, बाबाजी, तसेच मामी शुभांगी, श्रद्धा गुंजाळ, तसेच सटाणा शहरातील माणुसकीने दिलेला आधार मोलाचा असल्याचे त्या अभिमानाने सांगतात. काजल आणि दीपाली यांच्या आयुष्यात माहेरच्या मंडळींसह सटाणा शहरातील अॅड. एस. आर. चिंधडे, अॅड. सोमदत्त मुंजवाडकर, चेतन परदेशी, पवन परदेशी, घनश्याम भामरे, रूपाली भांगडिया, प्रमोद ठाकरे, अॅड. एस. आर. सोनवणे या माणुसकीची भिंत जपणाऱ्या समाजघटकांचे पाठबळही मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील मुलींसाठी अकादमी सुरू करणार

घरेलू मोलकरीण म्हणून काम करत असतानाच मंदिरात साफसफाई करण्यापासून ते कष्टाची अनेक कामे करत काजल आणि दीपाली या भगिनींनी गाठलेलं शिखर नक्कीच समाजातील काहीतरी करून स्वतःला सिद्ध करणाऱ्या घटकांसाठी प्रेरणादायी आहे. आयुष्यात वाट्याला आलेलं दुःख समोर न ठेवता परिस्थितीची जाणीव ठेवून याच जोरावर कसमादे परिसरातील गरजू, गरीब कुटुंबातील युवतींना पोलिस भरतीच्या निमित्ताने स्वतःला सिद्ध करता यावे म्हणून सटाणा शहरात ग्रामीण भागातील मुलींसाठी वाव मिळण्याच्या हेतूने करिअर अकादमी सुरू करण्यासाठी काजल आणि दीपाली यांची तयारी सुरू आहे. परिस्थिती कशीही असली तरी जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावर नक्कीच मात करता येते, हेच काजल आणि दीपाली या दोन्ही भगिनींनी दाखवून दिलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Sharan Singh : आता मी खुला सांड... तिकीट नाकारलेल्या ब्रिजभूषणनं कोणाला दिलं आव्हान?

Bhushan Patil: "शिवरायांचा छावा" फेम अभिनेता भूषण पाटील करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री; म्हणाला, "मी खूप उत्सुक आहे पण..."

Nashik News : मुंढेगावजवळ गोदान एक्सप्रेसच्या चाकाखालून धुर! प्रवाशांनी घाबरून मारल्या उड्या

Yogi Adityanath : पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्यांना भारतात थारा नाही : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT