एन्कर
घरमालकांनो सावधान; भाडेकरूंसाठी कडक नियमावली
पोलिस आयुक्तांचे मनाई आदेश; उल्लंघन केल्यास कारवाई
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ८ : पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ (१) व (३) अन्वये विशेष मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार शहरातील भाडेकरू, जुन्या वाहनांची खरेदी- विक्री, सिमकार्ड विक्रेते, सायबर कॅफे आणि सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या एजन्सींना त्यांची अद्ययावत माहिती संबंधित पोलिसांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सणासुदीच्या काळात शहरात घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. त्याच अनुषंगाने घर भाडेकरूंच्या माहितीसह जुन्या वाहनांची खरेदी-विक्रीबाबतची माहिती देणारा आदेश जारी केला असून, आगामी ६० दिवसांसाठी सदरचा आदेश लागू असेल. ज्या व्यक्ती किंवा संस्था या आदेशाचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम २२३ आणि इतर प्रचलित कायद्यांनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.
असे आहेत आदेश
१. घरमालक, हॉटेल्स व धार्मिकस्थळे
- मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा, धर्मशाळा, लॉजेस, हॉटेल्सचे संचालक तसेच घरमालकांनी त्यांच्याकडे राहणाऱ्या भाडेकरूंची/नागरिकांची माहिती (मूळ रहिवासी पुरावा, फोटो, भाडेकरारनामा) स्थानिक पोलीस ठाण्यात जमा करणे आवश्यक आहे. ही माहिती www.nashikpolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरही नोंदवता येईल.
२. परदेशी नागरिकांसाठी
- हॉटेल्स, लॉजेस व घरमालकांनी परदेशी नागरिकांच्या पासपोर्ट, व्हिसाची छायांकित प्रत आणि ''सी'' फॉर्म भरून संबंधित पोलीस ठाणे व नाशिक शहर पारपत्र शाखेकडे सादर करणे बंधनकारक आहे.
३. जुन्या वाहनांची खरेदी-विक्री
- चारचाकी व दुचाकी वाहनांचा विघातक कृत्यांसाठी वापर रोखण्यासाठी, जुन्या वाहनांची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी सर्व खरेदीदार व विक्रेत्यांच्या नावासह पत्त्याची अद्ययावत माहिती पोलिसांना व शासकीय यंत्रणांना लेखी स्वरूपात देणे अनिवार्य आहे.
४. सायबर कॅफे व सिमकार्ड विक्रेते
- बोगस सिमकार्डचा वापर आणि इंटरनेटचा गैरवापर टाळण्यासाठी सिमकार्ड विक्रेते व सायबर कॅफे चालकांनी ग्राहकांचे संपूर्ण नाव, पत्ता आणि ओळखपत्राची लेखी माहिती अद्ययावत ठेवून पोलिसांकडे सादर करावी.
५. भंगार विक्रेते व फेरीवाले
- भंगार साहित्याचा गैरवापर रोखण्यासाठी फेरीवाले व भंगार खरेदी-विक्री व्यावसायिकांनी आपल्याकडील सर्व व्यवहारांची नोंद पोलिसांना देणे आवश्यक आहे.
६. सुरक्षा रक्षक व मॅनपॉवर एजन्सी
- औद्योगिक वसाहतींना सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या एजन्सींनी आपल्या कर्मचाऱ्यांचे नाव, पत्ता, ओळखपत्र आणि शस्त्र परवान्याची अद्ययावत माहिती पोलिसांना सादर करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.