माळमाथा परिसरात पावसाअभावी पीके धोक्यात
-----------------------------------------
कपाशी, मका, कांद्यासह कडधान्यांवर संकट; पीक पाहणीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव शहर, ता. ३ : माळमाथा परिसरात ऐन खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांपुढे गंभीर संकट निर्माण झाले आहे. सुरुवातीच्या पावसाच्या भरवशावर कपाशी, मका तसेच कांद्याची लागवड करण्यात आली. महागडी बियाणे, कांदा रोपे, खते, औषधे, मशागत व मजुरीवर मोठा खर्च करूनही पिकांच्या वाढीच्या निर्णायक टप्प्यात पावसाने ओढ दिल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कपाशी व मक्याची पिके पावसाअभावी वाढीपासून वंचित असून अनेक ठिकाणी पाने कोमेजली आहेत. महागडी कांदा रोपे खरेदी करून लागवड केलेल्या शेतकऱ्यांनाही पाण्याच्या कमतरतेचा फटका बसत आहे. पावसाचा खंड वाढल्याने बाजरी, ज्वारी, भुईमूग व कडधान्यांचीही स्थिती गंभीर झाली आहे. अनेक ठिकाणी पिके सुकून कडब्याच्या अवस्थेत आहेत. पिकांची वाढ खुंटल्याने पिकांवर केलेला बियाणे, खते, औषधे, मशागत व मजुरीचा खर्चही निघण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती आहे.
माळमाथा परिसरातील स्थितीची शासन व प्रशासनाने तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष शेतांमध्ये पीक पाहणी करावी, अशी मागणी दहिवाळ-बोधे ग्रामपंचायतीचे प्रशासकीय सदस्य प्रा. हिरालाल नरवाडे यांनी केली. पावसाअभावी झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण व पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. तसेच पीकविमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.