पान-२ सेमेन
----------
CHE26B16977
नाशिकरोड ः येथील पोलिसांनी अटक केलेल्या रिक्षाचालकासह तपास करणारे पथक
-----------
३६-४
डमी प्रवासी बनत चोरीचा लावला छडा
-----------
नाशिकरोड पोलिसांची कारवाई; ६ लाखांची बॅग पळवणारे रिक्षाचालक जेरबंद
------------
सकाळ वृत्तसेवा
नाशिकरोड, ता. २५ : नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरातून प्रवाशाची ६ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग पळवून नेणाऱ्या रिक्षाचालकासह त्याच्या साथीदाराला नाशिकरोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. ४ लाख रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा ६ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तपासासाठी पोलिसांनी तीन दिवस डमी प्रवासी बनून रिक्षाचालकांच्या हालचालींची माहिती घेत अखेर चोराला गजाआड केले आहे. पोलिसांच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-----------
काठेगल्ली येथील सौरभ आहेर हे २० जूनला पत्नीच्या उपचारासाठी ६ लाख रुपयांची रोकड घेऊन मुंबईहून नाशिकरोडला आले होते. रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा शोधत असताना त्यांनी पैशांची बॅग रिक्षामध्ये ठेवली. भाड्यासाठी सुट्टे पैसे घेण्यासाठी बाजूला जाताच रिक्षाचालकाने बॅगेसह पलायन केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचा तपास करताना पोलिसांना सुरुवातीला सीसीटीव्ही फुटेजमधून ठोस धागेदोरे मिळाले नाहीत. त्यानंतर गुन्हे शोध पथकाने वेगळी शक्कल लढवत दोन ते तीन दिवस ‘डमी प्रवासी’ बनून नाशिकरोड ते नाशिकदरम्यान विविध रिक्षांमधून प्रवास केला. या मोहिमेदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे मोईन कुरेशी (रा. वडाळा नाका, जुने नाशिक) याच्यावर संशय बळावला. साहाय्यक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्या पथकाने २३ जूनला सापळा रचून मोईन कुरेशी याला रिक्षासह (एमएच १५, जेए-५०९४) ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत २ लाख रुपयांची रोकड पोलिसांच्या स्वाधीन केली. त्यानंतर त्याचा साथीदार शहाबाज सय्यद (रा. कथडा, जुने नाशिक) यालाही अटक करण्यात आली. त्याच्याकडून आणखी २ लाख रुपये जप्त करण्यात आले.
दोन्ही आरोपींनी चोरीची रक्कम आपापसात वाटून घेतल्याचे कबूल केले आहे. उर्वरित २ लाख रुपये पुणे येथील २० ते २५ वर्षीय एका अनोळखी तरुणाकडे असल्याची माहिती त्यांनी दिली असून, त्याचा शोध सुरू आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, साहाय्यक पोलिस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शोध पथकाच्या या धाडसी आणि कल्पक तपासामुळे प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, पोलिसांच्या ‘डमी प्रवासी’ मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
---------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.