सेंट्रल किचनविरोधात आदिवासी संघटनांचा ‘एल्गार’
ठेका रद्द करून आश्रमशाळांमध्येच ताजे जेवण बनविण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कळवण, ता. ५ : शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सेंट्रल किचनच्या कथित निकृष्ट आणि अस्वच्छ जेवणाविरोधात आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. विसापूरसह पाच आश्रमशाळांमधील आजारी विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन कळवण उपजिल्हा रुग्णालयात आले असता आदिवासी संघटनांनी रुग्णालयाबाहेर शनिवारी (ता. ५) ठिय्या आंदोलन करत सेंट्रल किचनविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
‘विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ थांबवा, सेंट्रल किचनचा ठेका रद्द करा,’ अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली. पूर्वीप्रमाणे प्रत्येक आश्रमशाळेत स्वयंपाकी नियुक्त करून विद्यार्थ्यांना ताजे आणि गरम जेवण देण्यात यावे, अशी ठाम मागणी या वेळी करण्यात आली.
उपजिल्हा रुग्णालयाबाहेर आदिवासी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. आंदोलक सुदाम भोये, चंद्रकांत गायकवाड आणि सोनीराम गायकवाड यांनी सेंट्रल किचनमधून पुरविण्यात येणाऱ्या अन्नाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
त्यांच्या म्हणण्यानुसार कळवण तालुक्यातील चणकापूर आणि सुरगाणा तालुक्यांतील माणे येथील सेंट्रल किचनमधून विविध आश्रमशाळांना भात, चपाती, भाजी, वरण-भात आणि सलाड पुरविले जाते. मात्र हे अन्न अनेकदा थंड, बेचव आणि निकृष्ट असल्याचा आरोप करण्यात आला. काही वेळा जेवणात अळ्या सापडल्याच्या तक्रारी पालकांनी केल्याचा दावाही आंदोलकांनी केला.
विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि पौष्टिक आहार मिळावा, या उद्देशाने आदिवासी विकास विभागाने सेंट्रल किचन योजना सुरू केली. मात्र, प्रत्यक्षात ही योजनाच विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याचा गंभीर आरोप आदिवासी संघटनांनी केला.
विसापूर आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. त्याच शाळेतील २५ विद्यार्थ्यांसह एकूण ३४ विद्यार्थ्यांना ताप, उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्याने कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, सेंट्रल किचनच्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आंदोलकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या प्रश्नाची दखल घेतली. सेंट्रल किचनला आदिवासी विद्यार्थी आणि विविध संघटनांचा विरोध असल्याचे आपल्या लक्षात आले असून, नाशिकमध्येही या प्रश्नावर आंदोलन सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असून, आगामी मंत्रिमंडळ बैठकीत सेंट्रल किचनचा मुद्दा मांडणार असल्याची ग्वाही महाजन यांनी दिली.
आमदार नितीन पवार, भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. भारती पवार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नगराध्यक्ष कौतिक पगार, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. काश्मिरा संख्ये, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पगार, दीपक खैरनार, गोविंद कोठावदे, हेमंत रावले, प्रवीण रौदळ, चेतन निकम, डॉ. अनिल महाजन, हितेंद्र पगार, सचिन सोनवणे, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष शशिकांत बागूल, प्रकाश आहेर, किसान आघाडीचे काशीनाथ गुंजाळ, मयूर वाघ आदी उपस्थित होते.
चौकट
विद्यार्थ्यांना अन्न की आजार?
आदिवासी विद्यार्थ्यांना पौष्टिक आणि दर्जेदार आहार देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या सेंट्रल किचन योजनेवरच आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. थंड आणि निकृष्ट अन्न, अळ्या सापडल्याच्या तक्रारी आणि विद्यार्थ्यांच्या आजारपणाच्या घटनांमुळे पालकांचा संताप वाढला आहे. ‘विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड नको; सेंट्रल किचन बंद करा,’ अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
चौकट
‘मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार’
सेंट्रल किचनला आदिवासी विद्यार्थी आणि संघटनांचा तीव्र विरोध असल्याची कबुली पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. या प्रश्नावर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आगामी मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
KLW26B09461
कळवण : उपजिल्हा रुग्णालयात सेंट्रल किचनच्या विरोधात शनिवारी आदिवासी संघटनांतर्फे करण्यात आलेल्या आंदोलनावेळी बोलताना पालकमंत्री गिरीश महाजन. शेजारी आमदार नितीन पवार, भाजपच्या उपाध्यक्षा डॉ. भारती पवार, नगराध्यक्ष कौतिक पगार आदी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.