‘डार्क स्काय’मुळे उदमाळच्या विकासाला नवे आकाश
आमदार नितीन पवार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पाहणी; पर्यटनातून रोजगारनिर्मितीवर भर
सकाळ वृत्तसेवा
कळवण, ता. १३ : ‘डार्क स्काय व्हिलेज’ म्हणून निवड झालेल्या उदमाळ (ता. सुरगाणा) गावाच्या पर्यटन व सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आमदार नितीन पवार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. कश्मिरा संखे यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह गावाची पाहणी केली. शाश्वत पर्यटनस्थळ म्हणून गावाचा विकास करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर यावेळी चर्चा झाली.
पर्यटकांसाठी रस्ते व दळणवळण, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज व नियंत्रित प्रकाश व्यवस्था, होम-स्टे, निसर्ग पर्यटन तसेच आकाश निरीक्षणासाठी आवश्यक सुविधा विकसित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. गावाचे नैसर्गिक वैशिष्ट्य कायम ठेवून नियोजनबद्ध विकास करण्यावर भर देण्यात आला.
यावेळी नवसु गायकवाड, राजू पवार, भास्कर अलबाड, विजय घांगळे, सरपंच तुळशीराम महाले, आनंदा झिरवाळ, माधव पवार, रमेश वाडेकर, दीपक मेघा, सावळीराम महाले, नवसु राऊत, उमेश पालवा, दिनेश चौधरी, रामदास केंगा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट
‘ताऱ्यांचे गाव’ ठरणार आकर्षण
नैसर्गिक अंधार, कमी प्रकाश प्रदूषण आणि आकाश निरीक्षणासाठी अनुकूल वातावरण ही उदमाळची वैशिष्ट्ये आहेत. नियोजित सुविधा उभ्या राहिल्यास पर्यटकांना तारांगणासह सुरगाण्याच्या निसर्गसौंदर्याचा अनुभव घेता येणार आहे. होम-स्टे, स्थानिक खाद्यपदार्थ, उत्पादने व निसर्ग पर्यटनातून ग्रामस्थांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
कोट
निरभ्र आकाशातील तारे स्पष्टपणे पाहता यावेत, यासाठी अनावश्यक प्रकाश प्रदूषण कमी करण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार गावातील प्रकाश व्यवस्थेचे नियोजन ‘डार्क स्काय’ संकल्पनेला अनुरूप करण्याबाबत चर्चा झाली. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून शाश्वत विकास आराखडा तयार करण्यात येईल.
- आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी नाशिक)
“उदमाळला मिळालेल्या विशेष ओळखीचा फायदा स्थानिक ग्रामस्थांच्या आर्थिक विकासासाठी झाला पाहिजे. पर्यटनातून युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मिळण्यासाठी आवश्यक विकासकामांना चालना देण्यात येईल.
- नितीन पवार (आमदार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.