पान एक ॲंकर
------------
09547
कळवण : ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत चित्ररथाचे उद्घाटन करताना डॉ. कश्मीरा संखे. शेजारी इतर अधिकारी.
आदिवासींच्या दारापर्यंत योजनांची माहिती पोहोचवा
प्रकल्पधिकारी डॉ. कश्मीरा संखे : कळवणला ‘सेवा संकल्प अभियान’
सकाळ वृत्तसेवा
कळवण, ता. १८ : आदिवासी समाजातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजना आणि सुविधांची माहिती पोहोचवून त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. कश्मीरा संखे यांनी केले.
कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू करण्यात आले. त्यानिमित्त जनजागृती चित्ररथाचे उद्घाटन आणि आदिवासी लाभार्थी मेळावा घेण्यात आला. हे अभियान १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीतपर्यंत राबविण्यात येणार आहे.
डॉ. संखे म्हणाल्या, की ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक नागरिक शासनाच्या योजनांसाठी पात्र असतानाही माहितीच्या अभावामुळे लाभापासून वंचित राहतात. ही दरी दूर करण्यासाठी चित्ररथाद्वारे गावोगावी योजनांची माहिती दिली जाईल. आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत आणि संबंधित कार्यालयांविषयीही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येईल. अभियानाच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागासह महसूल, पंचायत समिती आणि आरोग्य विभागाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल. बचत गटातील महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
मेळाव्यात आदिवासी बांधव आणि महिला बचत गटांच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उपस्थितांना विविध कल्याणकारी योजना, उपलब्ध सुविधा, अर्ज प्रक्रिया आणि रोजगाराच्या संधींबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली. एकाच ठिकाणी विविध योजनांची माहिती आणि मार्गदर्शन मिळाल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
या वेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी नित्तांत कांबळे, तहसीलदार रोहिदास वारुळे, ग्रामविकास अधिकारी रमेश वाघ, तालुका आरोग्य अधिकारी अभय बंगाळ यांच्यासह प्रकल्प कार्यालय, तहसील कार्यालय आणि पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.