साधूच्या वेशातील
भामट्यांचा २१ लाखांचा गंडा
मालेगाव : येथील टिपरे कॉलनी परिसरात साधूच्या वेशात आलेल्या भामट्याने व त्याच्या साथीदाराने २१ लाख १५ हजार ७२१ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. दिनेशकुमार भागचंद लोढा (वय ७०) यांच्या घरी आलेल्या दोघांनी विश्वास संपादन करून सोन्याच्या अंगठ्या व सोन्याची चैन चोरून नेली. तसेच लोढा यांचे सहकारी महेंद्रकुमार मोदी यांचेही साहित्य लंपास करण्यात आले. संशयित होंडा सिटी कारमधून आले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कॅम्प पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांधाच्या वादातून
महिलेला मारहाण
मालेगाव : आघार बुद्रुक (ता. मालेगाव) येथे शेतीच्या बांधाच्या वादातून एका महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.मिनाक्षी यशवंतसिंग परदेशी (वय ५१) यांना त्यांचे नातेवाईक मोहनसिंग परदेशी, मितीकेश परदेशी, हर्षल परदेशी व त्यांची दिराणी यांनी मारहाण केली. यशवंत परदेशी यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली. या घटनेत मिनाक्षी परदेशी यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली असून गळ्यातील पोत तुटून हरवली आहे. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मोबाईल चार्जिंगवरून
तरुणास मारहाण
मालेगाव : रमजानपुरा परिसरातील शेख आसीफ शेख मोहम्मद (वय ३३) यांना मोबाईल चार्जिंगच्या कारणावरून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.कारखान्यात मोबाईल चार्जिंग का करतो, असा जाब विचारत अकबर अली सय्यद अली ऊर्फ बंट्या याने त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर लाकडी दांड्याने डोक्यावर, डाव्या पायावर, गुडघ्यावर व उजव्या हातावर मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या आसेफा यांनाही शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी रमजानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विहिरीत पडून
महिलेचा मृत्यू
मालेगाव : नाळे (ता. मालेगाव) येथील एका महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला.संगिता बाळू यादव (वय ४८) त्यांच्या शेतातील विहिरीत पाणी काढताना तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या.परिसरातील नागरिकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र विहिरीत पाणी अधिक असल्याने अग्निशमन दलाचे जवान शकील तैराक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे ६० फूट खोल विहिरीत उतरून महिलेचा मृतदेह काढला. दीपक साळुंके यांनी त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अलीम यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सामाईक बांधाच्या वादातून
तरुणास मारहाण
मालेगाव : खडकी (ता. मालेगाव) शिवारात सामाईक बांधावरील दगड हलविल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. यश निवृत्ती वैद्य (वय २१, रा. खडकी) व त्याच्या आईला बाळू कारभारी बागुल यांनी सामाईक बांधावरील दगड हलविल्याच्या कारणावरून जाब विचारत शिवीगाळ केली. त्यानंतर बाळू बागुल, गौरव बाळू बागुल, गौरवचा मित्र आणि ज्ञानेश्वर अण्णाजी बागुल हे यशच्या घराजवळ आले. यावेळी गौरवने "तू माझ्या वडिलांना शिवीगाळ का केली?" या कारणावरून पुन्हा वाद घालत यशला मारहाण केली. त्यास इतरांनीही साथ दिली. हा प्रकार १८ जूनला सकाळी आठ ते साडेनऊच्या दरम्यान घडला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोकलेन मशीनमधून
जीपीएस डिस्प्लेची चोरी
मालेगाव : वडगाव येथील भरत देवरे (वय ५३) यांच्या मालकीच्या पोकलेन मशीनच्या केबिनमधून अज्ञात चोरट्यांनी एक लाख २० हजार रुपये किमतीचा जीपीएस डिस्प्ले पार्ट चोरून नेला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.