उत्तर महाराष्ट्र सीटीबीसाठी
--------
फोटो - 15338
नीलेश पवार
----
फोटो -15339
नीलेश पवार यांचे कुटुंबीय
-----
फोटो -15340
नीलेश पवार यांच्या डाळिंबाचा गोडवा चाखताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्व. अजितदादा पवार
----
फोटो -15341
नीलेश पवार यांच्या शेतातील लालबुंद डाळिंब
------
फोटो -15342
नीलेश पवार यांच्या शेतातील पाण्याचा ऑटोमायझेशन प्रकल्प
----
डाळिंबाच्या लालबुंद यशाचा महाराष्ट्रातील मानबिंदू
विदेशात डाळिंबाचा गोडवा पेरणारे युवा शेतकरी ‘नीलेश पवार’
लीड..
सातमाने (ता. मालेगाव) हे गाव आज राज्यभर डाळिंबाची पंढरी म्हणून ओळखले जाते. या ओळखीमागे कृषिभूषण पुरस्कार विजेते रवींद्र पवार यांची दूरदृष्टी आणि त्यांचे सुपुत्र नीलेश रवींद्र पवार यांची आधुनिक विचारसरणी आहे. पारंपरिक शेतीला विज्ञान, अभ्यास आणि सातत्याची जोड दिल्यास जागतिक बाजारपेठेतही यश मिळविता येते, हे नीलेश पवार यांनी सिद्ध करून दाखविले आहे. आज त्यांच्या बागेतून निघणारे लालबुंद डाळिंब युरोप, आशिया तसेच दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांपर्यंत पोहोचत असून जवळपास संपूर्ण उत्पादन निर्यात करणारे ते राज्यातील अग्रगण्य युवा शेतकरी ठरले आहेत.
नीलेश यांच्या यशामागे संघर्षाची मोठी कहाणी आहे. वडील रवींद्र पवार यांच्याकडे अवघी पाच एकर पारंपरिक शेती होती. आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण होती. त्याच काळात रावळगाव शेती महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापक संपतराव मोरे यांनी डाळिंब लागवडीचा सल्ला दिला. १ फेब्रुवारी १९८६ रोजी नीलेश यांचा जन्म झाला आणि त्यांच्या मावशीने भेट दिलेल्या एक ग्रॅम सोन्याच्या बाळ्या विकून मिळालेल्या पैशातून १९८७-८८ मध्ये डाळिंब लागवडीची सुरुवात झाली. या एका निर्णयाने पवार कुटुंबाचे भविष्य बदलले.
पवार कुटुंबाने जपली बाग
दुष्काळ, पाण्याची टंचाई आणि आर्थिक संकट यांचा सामना करत पवार कुटुंबाने पहिली बाग जपली. १९९१ मध्ये डाळिंब विक्रीतून अकरा हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आणि त्यातून घराला आर्थिक आधार मिळू लागला. नीलेश यांच्या जन्माबरोबरच डाळिंबानेही कुटुंबाच्या आयुष्यात भरभराट आणली, अशी भावना आजही पवार कुटुंब व्यक्त करते.
शेतीशी नाते कायम
घरची परिस्थिती हलाखीची असल्याने नीलेश यांचे बालपण शिक्षणासाठी घरापासून दूर गेले. सातारा जिल्ह्यातील सासुरे येथे चौथीपर्यंत शिक्षण, त्यानंतर मालेगाव व रावळगाव येथे पुढील शिक्षण घेत त्यांनी शेतीशी नाते कायम ठेवले. दहावीनंतर त्यांनी शिक्षणाबरोबर वडिलांना शेतीत हातभार लावला. महाविद्यालयीन शिक्षण बाहेरून पूर्ण करत त्यांनी शेतीला जीवनाचे ध्येय मानले.
नीलेश यांचे पहिले गुरू म्हणजे त्यांचे वडील रवींद्र पवार. त्यांनी मुलाला केवळ शेती शिकवली नाही, तर निसर्ग वाचण्याची दृष्टी दिली. अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत नीलेश यांनी शेतीचे स्वरूप बदलले. बाजारपेठेचा अभ्यास, गुणवत्तेवर भर आणि नियोजनबद्ध उत्पादन यामुळे त्यांच्या डाळिंबाला परदेशी बाजारपेठेत मोठी मागणी निर्माण झाली.
आज पवार कुटुंबाची फळबाग नव्वद ते पंच्याण्णव एकरांवर विस्तारली आहे. डाळिंबाबरोबरच सीताफळ, द्राक्ष, पेरू, आंबा, संत्री, मोसंबी, शतावरी आणि स्ट्रॉबेरी यांची लागवड करण्यात आली आहे. मात्र डाळिंब हेच त्यांच्या यशाचे मुख्य आधारस्थान ठरले आहे.
पाण्याचे महत्त्व ओळखून नीलेश यांनी शेतीत मोठी गुंतवणूक केली. प्रत्येकी तीन कोटी लिटर क्षमतेची तीन विशाल शेततळी उभारली. पाण्यातील क्षार वेगळे करणारी अत्याधुनिक शुद्धीकरण व्यवस्था उभारून डाळिंबाला शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले. त्यामुळे झाडांची वाढ, फळांचा दर्जा आणि उत्पादनात मोठी वाढ झाली. ठिबक सिंचन सुरळीत राहू लागले आणि बागेचे व्यवस्थापन अधिक सुलभ झाले.
नावीन्यपूर्ण प्रयोग
डाळिंब लागवडीत त्यांनी अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग केले. इटलीच्या धर्तीवर संरक्षक जाळीचा वापर करणारा देशातील पहिला यशस्वी प्रयोग त्यांनी राबविला. जाळीची उंची, आधाररचना आणि सिंचन व्यवस्थेतील बदल यामुळे उत्पादनाचा दर्जा अधिक उंचावला. त्यांच्या या प्रयोगांचा अभ्यास करण्यासाठी देशभरातील हजारो शेतकरी सातमाने येथे भेट देतात. पवार यांची बाग आज अनेकांसाठी मार्गदर्शन केंद्र ठरली आहे.
विविध संस्थांकडून सन्मान
नीलेश यांचा अभ्यास आणि नवकल्पना पाहून विविध संस्थांनी त्यांना गौरविले आहे. राज्यातील अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला आहे. त्यांच्या पाणी व्यवस्थापन आणि शेतीतील प्रयोगांची दखल घेऊन अनेक अधिकारी आणि तज्ज्ञांनी त्यांच्या शेताला भेट दिली. त्यांच्या कार्यामुळे त्यांना परदेश अभ्यास दौऱ्याची संधीही मिळाली. इस्रायलमधील आधुनिक शेतीचा त्यांनी अभ्यास केला असून त्याचा उपयोग आपल्या शेतात यशस्वीपणे केला आहे. त्यांच्या डाळिंबाच्या गुणवत्तेची चर्चा मंत्रालयापर्यंत पोहोचली. राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या डाळिंबाची चव चाखून कौतुक केले. मात्र या सर्व यशानंतरही नीलेश पवार यांचे पाय जमिनीवरच राहिले. ते आजही प्रत्येक झाडाची पाहणी स्वतः करतात आणि प्रत्येक निर्णयात गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देतात.
त्यांच्या यशामागे कुटुंबाची मोठी साथ आहे. आई सुरेखा पवार, वडील रवींद्र पवार, भाऊ ज्ञानेश्वर आणि पत्नी रोहिणी यांनी प्रत्येक टप्प्यावर खंबीर साथ दिली. कुटुंबातील सर्व सदस्य शेतीच्या विविध कामांत सहभागी होत असल्याने हा यशस्वी प्रवास अधिक बळकट झाला आहे.
शंभरहून अधिक मजुरांना रोजगार
नीलेश पवार यांच्या शेतात दररोज शंभरहून अधिक मजुरांना रोजगार मिळतो. त्यांच्या राहण्याची, पिण्याच्या पाण्याची आणि इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. मजुरांच्या मुलांच्या शिक्षणालाही प्रोत्साहन दिले जाते. श्रमाला सन्मान देणारी ही भूमिका त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा पैलू आहे.
आत्मविश्वासाचे प्रतीक
आज सातमानेतील डाळिंब केवळ एक पीक राहिलेले नाही; ते ग्रामीण विकास, आधुनिक शेती आणि आत्मविश्वासाचे प्रतीक बनले आहे. एका छोट्याशा सोन्याच्या बाळ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचला आहे. नीलेश पवार यांनी सिद्ध केले आहे की जिद्द, अभ्यास, आधुनिक तंत्रज्ञान आणि कुटुंबाचा विश्वास यांच्या जोरावर शेतीतही जागतिक यश मिळविता येते. त्यांची यशोगाथा राज्यातील प्रत्येक युवा शेतकऱ्यासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे.
कोट
शेती ही केवळ व्यवसाय नसून ती विज्ञान, संयम आणि सातत्याची साधना आहे. संकटांवर मात करत आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्तेची बांधिलकी आणि बाजारपेठेचा अभ्यास यांची सांगड घातली तर शेतीत अमर्याद संधी आहेत. युवकांनी शेतीकडे नव्या दृष्टीने पाहावे, प्रयोगशीलता स्वीकारावी आणि ग्रामीण भारताच्या प्रगतीत आपला सक्रिय सहभाग नोंदवावा.
- नीलेश पवार
चौकट
यशाचा प्रवास
जन्म : १ फेब्रुवारी १९८६
गाव : सातमाने, ता. मालेगाव
सुरुवात : एक ग्रॅम सोन्याच्या बाळ्या विकून डाळिंब लागवड
आजची फळबाग : ९० ते ९५ एकर
प्रमुख वैशिष्ट्य : जवळपास संपूर्ण उत्पादन निर्यात
चौकट
नावीन्यपूर्ण उपक्रम
- तीन विशाल शेततळी
- पाण्यातील क्षार वेगळे करणारी शुद्धीकरण व्यवस्था
- संरक्षक जाळीतील डाळिंब लागवडीचा यशस्वी प्रयोग
- संपूर्ण शेतीचे यांत्रिकीकरण
- सेंद्रिय शेतीवर विशेष भर
चौकट
सामाजिक बांधिलकी
- दररोज शंभरहून अधिक मजुरांना रोजगार
- राहण्याची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
- मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन
- युवा शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन
- देशभरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.