वनपट्ट्यांच्या वादाबाबत जिल्हाधिकाऱ्यांची मध्यस्थी
---------------------------------------------------
मोहपाडा ग्रामपंचायत वादात महसूल, पोलिस, वन विभागाची बैठक
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. १९ : मोहपाडा ग्रामपंचायत हद्दीतील वनजमिनीवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे बैठक झाली. ग्रामस्थ, अतिक्रमणधारक तसेच महसूल, वन आणि पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. माजी आमदार जे. पी. गावित, निखिल पवार यांच्यासह ग्रामस्थांनीही भूमिका मांडली.
जिल्हाधिकारी डॉ. प्रसाद यांनी २००५ पूर्वीच्या अतिक्रमणांची सॅटेलाइट प्रतिमांच्या आधारे शहानिशा करण्याचे निर्देश दिले. ज्या क्षेत्रातील वनहक्क दावे अद्याप मंजूर झालेले नाहीत, तेथील अतिक्रमणधारकांच्या पीकपेरणीची तपासणी करून अहवाल तयार करण्यास सांगितले.
अपात्र दावेदारांनी विभागीय आयुक्तांसमोर दाखल केलेल्या अर्जांवर विभागीय स्तरावर निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
मोहपाडा ग्रामस्थांनी वनहक्क दावे फेटाळलेल्या व्यक्तींचे अतिक्रमण तत्काळ हटवावे, अशी मागणी केली. तर अतिक्रमणधारकांनी सध्या पिके उभी आहेत. वनहक्क दाव्यांबाबत विभागीय समितीकडे अर्ज केले आहेत. निर्णय होईपर्यंत अतिक्रमण हटवू नये, अशी भूमिका माजी आमदार गावित यांनी मांडली. दोन्ही बाजूंचा वाद सामंजस्याने सोडवावा. पशुपालकांसाठी चराई क्षेत्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
‘आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती’चे निखिल पवार यांनी पात्र वनहक्क दावेदारांना वनपट्टे द्यावेत. अपात्र दावेदारांचे अतिक्रमण तत्काळ हटवावे, अशी मागणी केली. वनहद्दीलगतच्या गावांमध्ये गुरेचरणासाठी चराई कुरण विकसित करावे, असेही त्यांनी सांगितले. वनपट्टेधारक आणि ग्रामस्थ पशुपालक यांच्यातील वादामुळे तालुक्यातील शांतता धोक्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, उपवनसंरक्षक नाशिक पूर्व राकेश शेपट, प्रांताधिकारी नितीन सदगीर, तहसीलदार विशाल सोनवणे, सहाय्यक वनसंरक्षक शेखर तनपुरे, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रघुनाथ शेगर, मोहपाडाचे सरपंच भगवान बोरकर, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रल्हाद बोरकर, पोलिसपाटील चैत्राम बोरकर, उपोषणकर्ते संतोष बोरकर, सिताराम बोरकर, योगेश बिचकुले, त्र्यंबक आयनर, सोपान करगळ आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.