नांदगावला अविष्कार
संशोधन कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. ९ : मविप्र समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘अविष्कार’ संशोधन स्पर्धेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी संशोधन मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करणे, चिकित्सक विचारसरणी विकसित करणे तसेच नावीन्यपूर्ण व समाजोपयोगी संशोधनाला प्रोत्साहन देणे हा कार्यशाळेचा उद्देश असल्याचे समन्वयक डॉ. एम. पी. मेश्राम यांनी प्रास्ताविकात सांगितले.
प्रा. डॉ. किरणकुमार खंदारे यांनी संशोधन प्रक्रियेचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या मनातील जिज्ञासा ही संशोधनाची पहिली पायरी असून, समस्येकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहणे, प्रश्न उपस्थित करणे व त्याचे शास्त्रीय पद्धतीने उत्तर शोधणे म्हणजे संशोधन होय. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता परिसराचे निरीक्षण करून संशोधनाच्या संधी शोधाव्यात, असे त्यांनी सांगितले. ‘अविष्कार’ संशोधन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण, वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित व समाजोपयोगी संशोधन प्रकल्प सादर करावेत, असे आवाहन प्राचार्य डॉ. एन. यू. पाटील यांनी केले. उपप्राचार्य डॉ. एस. ए. मराठे, पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. सी. बी. निगळे, समन्वयक प्रा. एम. बी. आटोळे, डॉ. आर. डी. झनकर व प्रा. बी. पी. मोरे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. व्ही. ए. गागरेपाटील यांनी केले. प्रा. अंकुश लवाटे यांनी आभार मानले. समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.