प्रवीण पडवळ नाशिक परिक्षेत्राचे ‘आयजी’
चंद्रकांत गवळी उपायुक्त पदी : किरीथिका, मिरखेलकर, गिर्ह यांची बदली
सकाळ वृतसेवा
नाशिक, ता. १५ : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, नाशिक पोलिस परिक्षेत्रात महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. अनुभवी अधिकारी प्रवीण पडवळ यांची नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान विशेष पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे यांची राज्य मानवी हक्क आयोगाच्या एसआयजी विभागात बदली करण्यात आली आहे.
प्रवीण पडवळ यांनी यापूर्वी २०११ ते २०१४ या कालावधीत नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते पोलिस प्रशिक्षण विभागात कार्यरत होते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या दृष्टीने त्यांच्या अनुभवाचा लाभ प्रशासनाला होणार असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, नाशिक ग्रामीणचे अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांची नागपूर शहरात उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शहर पोलिस आयुक्तालयातील मुख्यालयाच्या उपायुक्त किरिथिका सी. एम. यांची बदली नाशिक येथील गुन्हे दोषसिद्धी प्रशिक्षण विद्यालयाच्या प्राचार्यपदी करण्यात आली आहे. गुन्हे दोषसिद्धी प्रशिक्षण विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत गवळी हे आता नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात उपायुक्त म्हणून रुजू होणार आहेत. तसेच नाशिक सीआयडीचे अधीक्षक दीपक गिर्हे यांची अमरावती येथे उपायुक्तपदी बदली झाली असून, संदीप जाधव हे नवे सीआयडी अधीक्षक म्हणून नाशिकमध्ये कार्यभार स्वीकारतील.
आयजींच्या बदलीची पोलिस वर्तुळात चर्चा
इगतपुरी परिसरातील कथित कॉल सेंटर प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) सुरू असताना काही पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या बदलीची चर्चा सुरू असतानाच विशेष पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्या बदलीबाबतही पोलिस वर्तुळात विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. राज्यभर चर्चेत असलेल्या आणखी एका प्रकरणाशीही त्यांचे नाव जोडले जात असल्याने या बदल्यांबाबत चर्चांना उधाण आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.