पान एक
----------------
शहरात डेंगीचा कहर, रुग्णसंख्या शंभरीपार
९ जणांना चिकनगुणिया तर १२ रूग्णांना मलेरिया
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२ : शहरात पावसाळी कीटकजन्य आजारांनी डोकेवर काढले आहे. डेंगीच्या रुग्णांचा आकडा १०१ वर गेला असून ऑगस्टमध्ये सर्वाधिक ४५ रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय ९ जणांना चिकुनगुनियाची आणि १२ जणांना मलेरियाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे.
पावसामुळे रिकामे प्लॉट, बांधकाम साइट्स, तळघर, भंगार डेपो, टायरची दुकाने आणि इमारतींच्या छतावरील पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी साचून डेंगीच्या डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. सुरुवातीचे सहा महिने नियंत्रणात असलेला डेंगी पावसाचा जोर ओसरल्यानंतर वाढला. जानेवारी ते जून दरम्यान डेंगीचे फक्त २३ रुग्ण होते. परंतु जुलै आणि ऑगस्टमध्ये रूग्ण संख्येत ७८ नवीन रुग्ण आढळले.
महापालिकेच्या मलेरिया निर्मूलन विभागाने घरोघरी जाऊन तपासणी, अळी शोध मोहीम आणि औषध फवारणी सुरू केली आहे. शासकीय कार्यालये आणि बांधकाम साइट्सवर तपासणीत डेंगीच्या अळ्या सापडल्याने कारवाई करण्यात आली आहे. जुलैत १२० तर ऑगस्टमध्ये ८८ अशा एकूण २०८ आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात शासकीय तंत्रनिकेतन सामनगाव, जिल्हा परिषद इमारत, सीबीएस राज्य परिवहन महामंडळ बस स्थानक, जिल्हा परिषद नवीन इमारत, नाशिक रोड रेल्वे स्थानक, इएसआयएस हॉस्पिटल, भविष्य निधी कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा सांख्यिकी कार्यालय आणि अनेक बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे. महापालिका धूरफवारणी आणि अळीनाशक फवारणीचा दावा करत असली तरी अनेक भागात प्रत्यक्षात फवारणी होत नसल्याची तक्रार नगरसेवकांनी केली आहे.
-----------------
सिडको हॉटस्पॉट
ऑगस्टमधील ४५ रुग्णांचा विभागनिहाय आढावा घेतला असता सिडको विभागात सर्वाधिक १३ रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ नाशिक पूर्व (१२), पंचवटी (७), नाशिक पश्चिम (७) आणि सातपूर (६) रुग्ण आहेत.
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.